मुलींना मोफत शिक्षणाच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करा अभाविप देवगिरी प्रदेश अधिवेशनात ठराव
तीन दिवस चाललेल्या अधिवेशनाची सांगता
लातूर/प्रतिनिधी: मुलींना मोफत शिक्षण देण्याचा चांगला निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.परंतु अनेक महाविद्यालये त्याची अंमलबजावणी करत नाहीत. राज्य सरकारने या निर्णयाची प्रभावीपणे अमलबजावणी करावी, असा ठराव लातूर येथे झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगिरी प्रांताच्या 59 व्या अधिवेशनात संमत करण्यात आला.
दि. 2 ते 4 जानेवारी या कालावधीत लातूर येथे अभाविप देवगिरी प्रदेशाचे 59 वे अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनात शैक्षणिक सद्यस्थिती, सामाजिक सद्यस्थिती आणि ‘स्वयंरोजगार व रोजगार निर्मिती तसेच उद्योजकता विकासाकडे युवकांची ओढ निर्माण करण्यासाठी सरकारने आखावा कृती आराखडा’ असे तीन प्रस्ताव संमत करण्यात आले. परिसराच्या 500 मीटर अंतरात तंबाखूजन्य पदार्थांची तसेच अमली पदार्थांची विक्री करण्याच्या घटना उघड झाल्या आहेत, त्यावर निर्बंध घालावेत. महाविद्यालयात पायाभूत सुविधा वाढवाव्यात. रिक्त जागी प्राध्यापकांची भरती करावी. औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील उपकरणांचे नूतनीकरण करावे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीची कारणे शोधावी.
पेपरफुटीला आळा घालावा. वसतीगृहांची सुरक्षा वाढवावी. राज्यात एआय प्रयोगशाळा वाढवाव्यात, असे शैक्षणिक ठरावात म्हटले आहे.सामाजिक सद्यस्थितीवरील ठराव मंजूर करताना देशविरोधी प्रवृत्तीला आळा घालावा, ही मागणी करण्यात आली. राज्यात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्ती व संघटनांकडून समाजविघातक तसेच कट्टरपंथीय विचारसरणीला प्रोत्साहन मिळत आहे. त्यासाठी उपाय करावेत. बीड जिल्ह्यातील हत्येची घटना चिंताजनक असून परभणीतील घटनाही निंदनीय आहे. समाज विघातक प्रवृत्तीवर जरब बसवावी. महिला अत्याचाराच्या घटना वाढत असून त्या थांबवाव्यात, असे या प्रस्तावात म्हटले आहे. तिसऱ्या प्रस्तावात रोजगार निर्मितीची मागणी करण्यात आली आहे.जालना येथील ड्रायपोर्ट लवकर सुरू करावे. खानदेशातील बेरोजगारी दूर करण्यासाठी औद्योगिक गुंतवणूक वाढवावी. ‘एक जिल्हा एक उत्पादन’ यासारख्या योजना सामान्य नागरिक व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात.नवे उद्योग सुरू करण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करावी. कृषी उत्पादनावर आधारित उद्योग सुरू करावे, असेही या प्रस्तावात म्हटले आहे.मंजुरीनंतर तीन दिवस चाललेल्या या अधिवेशनाची सांगता झाली.अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ‘या विषयावर शिक्षण तज्ञ प्रा.अनिल राव यांनी मार्गदर्शन केले.नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ.मनोहर चासकर यांची या सत्रास प्रमुख उपस्थिती होती. समारोप सत्रात परिषदेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.मराठवाडा तसेच खानदेशातील विद्यार्थी प्रतिनिधी, प्राध्यापक प्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची या अधिवेशनास उपस्थिती होती.
