ठप्प झालेली राज्यातील सोयाबीन खरेदी पूर्ववत करा -धिरज विलासराव देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
: बारदाण्याचा तुटवडा दूर करून शेतकऱ्यांना तत्काळ दिलासा द्यावा
लातूर/ प्रतिनिधी
लातूरसह राज्यातील सोयाबीन खरेदीसाठी उघडण्यात आलेल्या बहुतांश खरेदी केंद्रावर गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून बारदाण्याचा तुटवडा असल्याने सोयाबीन खरेदी पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे खरेदी केंद्रावर दररोज चकरा मारण्याची वेळ शेतकरी बांधवांवर आली आहे. या प्रश्नात सरकारने त्वरित हस्तक्षेप करून सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा, अशी मागणी मा. आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केली.खरेदी केंद्रावरील सोयाबीन खरेदी ठप्प झाल्याने श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक (पुणे) यांना पत्र पाठवून या विषयाकडे त्यांचे लक्ष वेधले.
मा. आमदार धिरज विलासराव देशमुख म्हणाले, हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी लातूर जिल्ह्यात नाफेडच्या वतीने १६ हमीभाव केंद्र सुरु करण्यात आले आहेत तर महासंघाच्या ३५ केंद्रांना परवानगी देण्यात आली. मागील दीड महिन्यांपासून हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यात येत आहे. मात्र अचानक ५८० ग्रॅम ऐवजी ५३० ग्रॅम बारदाण्याचा शासनाने आग्रह केल्यामुळे बाजारात तुटवडा निर्माण झाल्याने खरेदी बंद झाली आहे. तसेच सोयाबीनसाठी शेतक-यांच्या उपलब्ध बारदाना वापरण्यास मनाई करून नवीन बारदाना वापरणे आवश्यक केल्याने शेतक-यांमध्ये असंतोष पसरला आहे.उपलब्ध बारदाण्याला मंजुरी देऊन तत्काळ खरेदी सुरु करा

मागील दोन-तीन आठवड्यांपासून शेतीमाल घेऊन येणारी वाहने हमीभाव केंद्रांवर थांबून आहेत. मात्र बारदाना उपलब्ध नसल्याने खरेदीचा नंबर येऊनही सोयाबीन उत्पादक शेतक-यांना थांबून रहावे लागत आहे. सोयाबीन खरेदी बंद असल्याने माल वाहतूक करणाऱ्या वाहनांचे भाडे शेतकऱ्यांना भरावे लागत आहे. अनेक शेतकऱ्यांना आर्थिक, मानसिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने यात हस्तक्षेप करून तातडीने बारदाणा उपलब्ध करुन द्यावा अथवा उपलब्ध बारदाण्याला मंजुरी देऊन सोयाबीनची तात्काळ खरेदी सुरु करावी तसेच ऑनलाईन नोंदणीसाठी एक महिन्याचा तर खरेदीसाठी २ महिन्यांचा कालावधी वाढवून द्यावा व शेतक-यांकडे उपलब्ध असलेला बारदाना वापरण्यास परवानगी देवून सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा, अशा मागण्या मा आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी पत्राद्वारे केल्या.
अन्यथा शेतकऱ्यांना क्विंटल मागे ८०० रुपयांचा तोटा
लातूर जिल्ह्यातील खरेदी केंद्र हे बारदाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने बंद आहेत. याबाबत शेतकरी वर्गातून सातत्याने तक्रारी येत आहेत. नोंदणी केलेल्या ४१ हजार १६३ शेतकऱ्यांपैकी आजवर केवळ ७ हजार शेतकऱ्यांचीच सोयाबीन खरेदी झाली आहे. खुल्या बाजारात सोयाबीन विक्री केली तर क्विंटल मागे शेतकऱ्यांना सुमारे ८०० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे या प्रश्नात सरकारने तातडीने हस्तक्षेप करायला हवा, असे मा आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी सांगितले.