जनतेला फसविणाऱ्यांना सत्तेतून पायउतार करा – आमदार धीरज देशमुख
सेवेत रुजू करून घेण्याचेही आवाहन
लातूर/प्रतिनिधी:राज्यातील महायुती सरकारने जनतेची फसवणूक केली आहे.या सरकारला पायउतार करण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्यासाठी २० तारखेच्या मतदानातून मला आपल्या सेवेत रुजू करून घ्या आणि महायुती सरकारला पायउतार करा,असे आवाहन लातूर ग्रामीण मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा उमेदवार धीरज देशमुख यांनी केले.
आ.देशमुख यांनी पिंपरी आंबा,बोरगाव बु.,शिराळा व निवळी येथे पदयात्रा काढून सभाही घेतल्या.यावेळी नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते.आ.देशमुख म्हणाले की,आपण लोकसभा निवडणुकीत परिवर्तनाला सुरुवात केली.काँग्रेसचा खासदार निवडून आणला. भाजपाच्या अटकेतून माजी खासदार सुधाकर शृंगारे यांना बाहेर काढत त्यांनाही व्यासपीठ मिळवून दिले.महायुती सरकार सोयाबीनला भाव देत नाही पण त्यांच्याकडे आमदारांसाठी भाव आहे.हे असे चालणार नाही. लोकशाहीची चेष्टा महायुती करत आहे.ती आपल्याला थांबवायची आहे.त्यामुळे मला रुजू करून घ्या,असे आवाहन त्यांनी केले. आपल्यासमोर जे उमेदवार आहेत ते मागील दोन निवडणुकांत पराभूत झाले आहेत.त्यांच्या पराभवाची हॅट्रिक करा,असेही आ.देशमुख यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी सांगितले की,मला भाजपा आमदारांनी त्यांच्या मतदारसंघात फिरवले पण निवडणुकीत मात्र दगा दिला. त्यामुळेच मी काँग्रेसमध्ये आलो. आ.धीरज देशमुख हे स्व. विलासराव देशमुख यांचे स्वप्न पूर्ण करू शकतात.त्यामुळे त्यांना बहुमताने विजयी करा,असे आवाहनही शृंगारे यांनी केले.
आ.धीरज देशमुख यांच्यासमवेत सुभाष घोडके, अनुप शेळके,विनोद माने,राजेसाहेब सवई, तात्यासाहेब पालकर,विलास नाना भिसे,शत्रुघ्न भिसे,अशोक भिसे,अरुण भिसे,नवनाथ भिसे यांची उपस्थिती होती.बोरगाव येथे अंगद जाधव व हनुमंत जाधव यांच्यासह काँग्रेस व महाविकास आघाडीचे असंख्य पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ.धीरज देशमुख यांच्या पदयात्रा आणि बैठकांना लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात नागरिक व मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
