• Thu. May 1st, 2025

शिंदे सरकारची क्लीन चिटच्या बंपर ऑफर:आधी प्रवीण दरेकर, मग किरीट सोमय्या, आता प्रसाद लाड यांनाही क्लीन चिट

Byjantaadmin

Dec 18, 2022

मुंबई:शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यातील भाजप नेत्यांना क्लीन चिटच्या बंपर ऑफर सुरू आहेत. मुंबई पोलिसांनी आता भाजपचे आणखी एक नेते आणि विधान परिषदेचे सदस्य प्रसाद लाड यांना 10 कोटींच्या फसवणूकीप्रकरणी क्लीन चिट दिली आहे. व्यापारी बिमल अग्रवाल यांनी प्रसाद लाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

प्रसाद लाड यांच्यावर काय आहेत आरोप?

प्रसाद लाड यांच्या क्रिस्टल ट्रेडकॉम प्रायव्हेट लिमिटेड आणि हणमंत गायकवाड यांच्या बीव्हीजी लिमिटेड यांनी संयुक्त उपक्रमाद्वारे बीव्हीजी-क्रिस्टल नावाची कंपनी स्थापन केल्याचा आरोप बिमल अग्रवाल यांनी केला आहे. लाड आणि गायकवाड यांनी स्थापन केलेल्या जॉइंट व्हेंचर कंपनीला मुंबई महापालिकेच्या जलसाठा आणि पंपिंग स्टेशनजवळ भिंत बांधण्याचे टेंडर मिळाले. अग्रवाल यांच्याशी सामंजस्य करार करून त्यांनी हे काम त्यांना दिले. या कामाच्या मोबदल्यात अग्रवाल यांच्या कंपनीच्या वतीने लाड व गायकवाड यांना 5 टक्के रॉयल्टी देण्याचे ठरले. काम पूर्ण झाल्यावर लाड आणि गायकवाड यांनी निविदांची संपूर्ण रक्कम त्यांच्या संयुक्त कंपनीच्या खात्यात वर्ग केल्याचा आरोप आहे. या कंपनीकडून जवळपास 10 कोटी रुपये घ्यायचे आहेत. मात्र, प्रसाद लाड व गायकवाड ही रक्कम त्यांना देत नाहीत, असा आरोपबिमल अग्रवाल यांनी केला आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 2014 सालच्या या प्रकरणी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. हे संपूर्ण प्रकरण दिवाणी वादाचे असून त्यात प्रसाद लाड यांना आरोपी बनवण्यासाठी कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयाला पोलिसांकडून क्लिट चिट मिळाल्याने याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

प्रवीण दरेकरांना क्लीन चिट

देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक तपास शाखेकडून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना एकापाठोपाठ जुन्या प्रकरणांमध्ये क्लीन चिट देण्यात येत आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. (मुंबई बँक) आर्थिक अनियमितता प्रकरणात भाजपचे विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. या बहुचर्चित राज्यातील कथित बँक घोटाळ्यात 123 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

किरीट सोमय्यांनाही क्लीन चिट

‘सेव्ह आयएनएस विक्रांत’ मोहिमेतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नीला यांना मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी ‘सेव्ह आयएनएस विक्रांत’ मोहिमेतून ५७ हजार कोटींचा घोटाळा केला होता. असा आरोप करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *