• Tue. Apr 29th, 2025

समान वागणूक, समान न्याय, समान अधिकार हा काँग्रेसचा विचार – आमदार धिरज देशमुख

Byjantaadmin

Nov 14, 2024

समान वागणूक, समान न्याय, समान अधिकार हा काँग्रेसचा विचार – आमदार धिरज देशमुख

लातूर प्रतिनिधी –   लोकसभेच्या निवडणुकीत लातूरच्या जनतेने खासदार निवडून दिला, मात्र तत्पूर्वी माजी खासदार सुधाकर श्रृंगारे यांना त्यांच्या पक्षाने लोकांपर्यंत पोहोचू दिले नाही. केवळ शिफारस पत्रे लिहून घेतली. आता काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. कारण काँग्रेसमध्ये नेहमीच  समान वागणूक, समान न्याय आणि अधिकार या विचारांना सर्वोच्च महत्त्व असल्याचे प्रतिपादन लातूर ग्रामीणचे महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी धिरज देशमुख यांनी लातूर तालुक्यातील निवळी, काळे बोरगाव, शिराळा, पिंपरी अंबा या गावांना भेट देत संवाद बैठका घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार सुधाकर श्रृंगारे, लातूर तालुका काँग्रेस अध्यक्ष सुभाष घोडके, राजेसाहेब सवई, अनुप शेळके आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

धिरज देशमुख म्हणाले की, सध्याचे वातावरण पाहता महाविकास आघाडीला विजयाचा गुलाल लागल्याशिवाय राहणार नाही, याची खात्री आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघातील जनतेने तीन वेळा काँग्रेस आमदार निवडून दिला आहे. आता विजयाचा चौकार मारायचा आहे, आणि या निवडणुकीत जे विरोधक पुन्हा एकदा नशीब अजमावत आहेत, त्यांच्या पराभवाची हॅटट्रिक करत आपल्याला विजय मिळवायचा असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना देशमुख यांनी युती सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रातील सत्ताधारी सरकारने षडयंत्र रचून महविकास आघाडी सरकार पाडले, आणि सत्ता स्थापन केली आहे. कोरोना नंतर महागाई बेरोजगारी हे प्रश्न प्रलंबित होते. शेतकरी सोयाबीनच्या भावासाठी संघर्ष करत असताना, हे सरकार आमदारांना विकत घेण्यात व्यस्त राहिले. आमदारांची किंमत लावून लोकशाहीची चेष्टा केली जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

देशमुख यांनी पुढे बोलताना सांगितले की, लोकनेते विलासराव देशमुख यांनी निवळीच्या माळरानांवर कारखाना उभा करून उसाच्या गाळपाचे काम सुरु केले. शेतकऱ्यांना ऊसाचा चांगला दर मिळेल, रोजगार निर्मिती केली जाईल ही आश्वासने आज पूर्ण झाली आहेत . काँग्रेसने कारखाने व बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली आहे. आता आगामी काळात महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर बेरोजगारांना चार हजार रुपये आणि महिलांना महालक्ष्मी योजनेतून तीन हजार रुपये मिळणार आहेत, असे त्यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध असून, “काँग्रेस है तो देश सेफ है” या शब्दांत त्यांनी विश्वास व्यक्त केला.

देशमुख यांनी सरकारवर जोरदार टीका करताना म्हटले की, विरोधात असताना सोयाबीनला 6,000 रुपये भाव मागणारे सत्तेत असताना भाव देत नाहीत. त्यामुळे अशा सरकारला मतदान मागण्याचा अधिकार नाही. खोटी आश्वासने देऊन, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या जागी त्यांनी अंबानी आणि अदानी यांच्या संपत्तीची वाढ केली, असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.यावेळी देशमुख यांनी काँग्रेसच्या विचारधारेवर भर देत, शेतकरी आणि कामगारांसाठी काँग्रेस नेहमीच लढत राहील, असा निर्धार व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed