लातूरच्या सर्वांगीण विकासासाठी १०० टक्के योगदान देणार -डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
लातूर/प्रतिनिधी:लातूरचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर इथे नोकऱ्यांची संधी उपलब्ध असणे गरजेचे आहे.येथील ज्ञानाचा उपयोग लातूरकरांना झाला पाहिजे.या नोकऱ्या उपलब्ध होण्यासाठी आयटी क्षेत्रातील कंपन्या लातूरला येणे आवश्यक असून त्यासाठी १०० टक्के योगदान देणार असल्याचे प्रतिपादन भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांनी केले.
सांदिपनी टेक्निकल कॅम्पस व एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित विद्यार्थ्यी संवाद बैठकीत डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर बोलत होत्या.
एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात भाजप युवा नेते ऋषीकेशद कराड,युवामोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर,हैबतपूरकर महाराज, प्राचार्या कुलकर्णी यांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ. अर्चनाताई पाटील चाकुरकर म्हणाल्या की,लातुरने शैक्षणिकक पॅटर्न निर्माण केला परंतू नोकऱ्यांच्या संधी येथे उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाने लातूर मागे राहिले. त्यामुळे येथील युवक मुंबई,पुणे, बेंगलोर आदी ठिकाणी नोकरीसाठी जातात.यापुढे असे होणार नाही.लातुरात जसा शैक्षणिक पॅटर्न निर्माण झाला तसेच नोकऱ्यांसाठी लातूरमध्ये संधी उपलब्ध करुन देण्याचे काम आम्ही पुर्ण शक्तीने करु,असे ताई म्हणाल्या.
युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की,येथील राज्यकर्ते लातुरात सुरक्षित वातावरण देऊ शकले नाहीत.गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.यावर अंकुश ठेवण्यास स्थानिक आमदार कमी पडले.त्यामुळे विकासाची दृष्टी असलेल्या भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांना विधानसभेत जाण्याची संधी द्यावी.लातुरात परिर्वतन होणार आहे.त्यात तरुणांनी आपला वाटा उचलून भाजपाला सहकार्य करावे,असे आवाहन कव्हेकर यांनी केले.
ऋषीकेश कराड यांनी लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे १५ वर्षांपासून नेतृत्व करणाऱ्यांनी मतदारसंघासाठी केले तरी काय ? असा प्रश्न उपस्थित केला.
हैबतपूरकर महाराजांनी सकारात्मक परिवर्तनात युवकांनी सहभागी होवून डॉ.
अर्चनाताई पाटील चाकुरकर यांना मतदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांनी उपस्थित युवक – युवतींसोबत मनमोकळा संवाद साधला.त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत विद्यार्थ्यांची मने जिंकली.सांदिपनी कॅंपस मध्येही विद्यार्थी व प्राध्यापकांशी संवाद साधत ताईंनी सर्वांचे मनोगत जाणून घेतले.
या संवाद बैठकीस एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय,सांदिपनी टेक्निकल कॅम्पसचे विद्यार्थी, प्राध्यापक मोठया संख्येने उपस्थित होते.
