संभाजीरावाना आमदार करा ते मंत्री म्हणून काम करतील – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
रेल्वेमार्गासाठी आ.निलंगेकरांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही
देवणी/ प्रतिनिधी:आ.संभाजीराव पाटील निलंगेकर हे कार्यसम्राट आमदार आहेत.ते युवा असून त्यांच्याकडे काम करण्याची अफाट शक्ती आहे. एक प्रभावी आमदार अशी त्यांची ओळख आहे.त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करत आमदार करा.निवडणुकी नंतर केवळ आमदार नाही तर मंत्री म्हणून ते काम करतील. संभाजीरावांना मंत्रिपद मिळण्याची हमी मी घेतो,असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.मतदारसंघातील रेल्वेमार्गासाठी आपण आ.निलंगेकरांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
निलंगा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार माजीमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रचारार्थ देवणी येथे आयोजित जन स्वाभिमान सभेत गडकरी बोलत होते.या सभेस आ.शरणू सलगर, माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर,व सुनिल गायकवाड, वीरुपाक्ष महाराज मुखेडकर, माजी आमदार गोविंद केंद्रे व प्रकाश खंड्रे,प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण,भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख,तालुकाध्यक्ष काशिनाथ गरीबे,मंगेश पाटील, कुमोद लोभे,माजी जि.प.सदस्य रामचंद्र तिरुके,संजय दोरवे,गोविंद चिलकुरे,प्रशांत पाटील, शिवानंद हैबदपुरे,भगवान पाटील तळेगांवकर,शिवसेना उप जिल्हा प्रमुख सुधीर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की,काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर रशियाची धोरणे स्वीकारली.त्या धोरणांचे परिणाम काय झाले ? हे आज आपण पाहत आहोत.सरकारी विमान कंपन्या तोट्यात गेल्या. सोन्याच्या खाणीही तोट्यात गेल्या.याशिवाय जिथे काँग्रेसने हात घातला तिथे नुकसानच झाले.त्याऐवजी काँग्रेसने गावाच्या विकासाला गती दिली असती तर हे चित्र दिसले नसते. लोकशाहीत बदल घडविण्यासाठी योग्य धोरण आणि नीतीची गरज असते, असे गडकरी म्हणाले.
त्यांनी सांगितले की, केंद्र आणि राज्य सरकारकडून गरीब कल्याणाच्या योजना राबविल्या जात आहेत.सरकारने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून गावे एकमेकांशी जोडली.सरकारची ही प्राथमिकता आहे.काँग्रेसला ६० वर्षात जे करता आले नाही ते आम्ही १० वर्षात करून दाखवले.भारताला विश्वगुरू बनवणे हे आपले ध्येय आहे. भ्रष्टाचार मुक्त भारत,ग्रामीण व कृषीमध्ये अग्रेसर भारत निर्माण करण्यासाठी आम्ही काम करत आहोत.देशाला सुखी,समृद्ध व संपन्न बनवायचे असेल,राज्याला सुखी ठेवायचे असेल,राज्यातील गरिबी व जातीयता दूर करायची असेल तर योग्य हातात सत्ता देण्याची गरज असल्याचेही गडकरी म्हणाले.
नितीन गडकरी यांनी सांगितले की,संविधानाची मूलतत्त्वे बदलता येत नाहीत.तरीही काँग्रेसकडून आरोप केला जातो. काँग्रेसने संविधान बदलाबाबत बोलणे म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ आहेत.आणीबाणीच्या काळात काँग्रेसने संविधानाच्या कशा चिंधड्या उडवल्या हे आपण पाहिले आहे.भाजपा मुस्लिम विरोधी असल्याचा प्रचार केला जातो परंतु पक्षाने कुठलीही योजना राबवताना कधीही जातीपातीचा विचार केला नसल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले.
आ.संभाजीराव पाटील निलंगेकर हे स्वतःच्या ताकदीवर जिल्ह्याच्या व मतदारसंघाच्या समस्या सोडविणारे प्रभावी आमदार आहेत.त्यांच्या पाठीशी राहत प्रचंड मतांनी निवडून द्या, असे आवाहनही गडकरी यांनी केले.ग्रामीण क्षेत्र विकासामध्ये आ.संभाजीराव पाटील यांचे काम मोठे आहे.अक्कांनीही लोकसभेत प्रतिनिधित्व करताना विविध प्रश्न मांडून त्यांची सोडवणूक करून घेतली.लातूर शहरातील महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा हलवण्यास विरोध असताना आ.संभाजीराव पाटील शिष्टमंडळ घेऊन माझ्याकडे आले होते.हा पुतळा न हलविण्याच्या सूचना आ. निलंगेकर यांच्यामुळेच आपण दिल्याचेही गडकरी म्हणाले.यावेळी बोलताना आ. निलंगेकर यांनी सांगितले की, मतदारसंघाच्या विकासासाठी जे- जे मागितले ते सर्व देण्याचे काम नितीन गडकरी यांनी केले आहे.दिल्लीत महाराष्ट्राच्या हक्काचा व विश्वासाचा माणूस अशी गडकरी यांची ओळख आहे.लातूर-गुलबर्गा रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्यात लक्ष घालावे अशी मागणी करत देवणी गोवंशाचे संवर्धन व्हावे तसेच हंचनाळ ते धनेगाव व राणी अंकुलगा येथील पुलांना मंजुरी देण्याची मागणी आ. निलंगेकर यांनी आपल्या भाषणात केली.
निलंगा मतदारसंघात वारकरी संप्रदायाचे लोक राहतात परंतु बाभळगावातून येथे विष पेरणीचे काम केले जात आहे.हप्ते व खंडणी घेणाऱ्यांना आपले मत देणार का ? असा सवाल करत ही लढत महायुती विरुद्ध बाभळगाव अशी होणार असल्याचे आ.निलंगेकर म्हणाले. मुलीचे लग्न करताना आपण निर्व्यसनी मुलगा पाहतो.त्याच पद्धतीने योग्य उमेदवार पाहून मतदान करा,असे आवाहनही आ.निलंगेकर यांनी केले.यावेळी वीरूपाक्ष महाराज मुखेडकर यांनी आशीर्वाचन दिले.माजी खासदार डॉ.सुनिल गायकवाड,आ.शरणू सलगर,माजी आमदार गोविंद केंद्रे, प्रकाश खंड्रे,प्रदेश प्रवक्ते शिवानंद हैबतपुरे,जिल्हा बँकेचे संचालक भगवानराव पाटील तळेगावकर, संजय दोरवे,सुरज चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले.या जन स्वाभिमान सभेस निलंगा विधानसभा मतदारसंघातील निलंगा,शिरूर अनंतपाळ व देवणी या तीनही तालुक्यातील महायुतीचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
आ.संभाजीराव पाटील दमदार नेता – गडकरी
आपल्या भाषणात नितीन गडकरी म्हणाले की,आ. संभाजीराव पाटील निलंगेकर हे दमदार आमदार आहेत.ते कार्यसम्राट,मराठवाड्याचे दमदार नेते व महाराष्ट्रातील कार्यक्षम युवा नेते आहेत.त्यांची कार्यपद्धती उत्तम असून काम करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. म्हणून मी पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा आहे,असे ना. गडकरी म्हणाले.
रेल्वे मार्गाचे काम तडीस नेणार…
आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने ना.गडकरी यांनी हंचनाळ ते धनेगाव व अंकुलगा येथील पुल बांधण्यास मंजुरी देत त्यासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले. रेल्वे मार्गासाठी मी रेल्वेने मंत्र्यांना विनंती केली होती. आता सर्वेक्षणाचे काम झाले आहे.हे काम तडीस नेण्यासाठी मी संभाजीरावांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.येरोळ ते गुलबर्गा हा दोन राज्यांना जोडणारा मार्ग इंटरस्टेट कनेक्टिव्हिटी मधून मंजूर करून देऊ,असे आश्वासनही गडकरी यांनी यावेळी बोलताना दिले.

काँग्रेस व आघाडीकडून जनतेला ‘कन्फ्युज’ करण्याचे काम
काँग्रेसने विकासकामे केली नाहीत.त्या पक्षाला विकासाचे राजकारण करता आले नाही.त्यामुळेच काँग्रेस व महाविकास आघाडी कडून जनतेला ‘कन्फ्युज’ करण्याचे काम केले जात असल्याचे नितीन गडकरी यांनी या सभेत बोलताना सांगितले.