महायुतीचे सरकार लबाड सरकार, आमदार धिरज देशमुखांची घणाघाती टीका
लातूर (प्रतिनिधी) – विधान निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण सारखी योजना आणून आम्ही जुगाड केले, असे महायुतीचे आमदार सांगत आहेत. योजना आणून जनतेवर दडपशाही करणे, भीती दाखवणे, कसलाही विचार नसलेले हे महायुतीचे सरकार म्हणजे एक लबाड सरकार आहे, अशी घणाघाती टीका आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केली. ते लातूर तालुक्यातील गातेगाव, एकुर्गा, ढाकणी या गावांमध्ये संवाद बैठकीमध्ये बोलत होते. आम्ही शेतकऱ्याचे खिसे भरण्याचं काम करतो हे खिशाला कात्री लावण्याचं काम करतात, असे देखील देशमुख म्हणाले.
धिरज देशमुख बोलताना म्हणाले की, . जीएसटी आम्ही भरतो. कर्जमाफी मात्र उद्योगपतींना दिली जाते. महायुती सरकारने साडे बारा हजार कोटी रुपयांची उद्योगपतीं कर्ज माफ केले. दुसरीकडे शेतकरी हमीभाव मागतो, त्यांना हमी भाव मिळत नाही. महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बेरोजगारी, महिला सुरक्षा, शेतीमालाला भाव पाहिजे असेल तर महाविकास आघाडी सरकार हाच जनतेसमोर समर्थ पर्याय आहे.
महायुतीकडे व्हिजन नाही – देशमुख
निवडणुकीत एक व्हिजन असले पाहिजे. पण महायुतीकडे काही व्हिजन नाही. केंद्र सरकारने दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देऊ असं सांगितलं. ते रोजगार का देऊ शकले नाहीत. आज जे उद्योग लातूरमध्ये आहेत. तेथे लातूरचीच मुले कामाला आहेत. आम्ही शेतकऱ्यांच्या मुलाला ऊस तोडणी यंत्र दिले. त्यांना उत्पन्न मिळवून दिले. साडेचारशे बेरोजगारना मांजरा परिवारांने रोजगार दिला, असल्याचे देखील आमदार देशमुख यांनी सांगितले. तुमचे खिसे भरले पाहिजेत त्याला कात्री नको. केंद्र व राज्य सरकार रोजगार का देऊ शकले नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
एकीकडे शेतकऱ्यांना वीज मोफत म्हटली जाते आणि घरगुती विजेचे दर वाढवले आहेत. महाराष्ट्राची निवडणूक आहे. महाविकास आघाडी सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारी आहे. स्थानिक भाजप नेत्यांनी भाजप नेत्यांनी दलित खासदाराला सन्मानाने वागणूक दिली नाही. मग सामान्य जनतेच्या समस्या ते कशा प्रकारे सोडवतील?, असा संतप्त सवाल देखील आमदार देशमुखांनी विचारला.
फेल बेणं शेतकरी लावत नाही – देशमुख
विरोधी उमेदवार वशिल्याने ऍडमिशन घेऊन आमदार झालेआहेत. आमदार होऊन तीन वर्ष झाले. तीन वर्षांत अधिवेशनामध्ये शेतकरी, बेरोजगारी, महिला यांच्या समस्या आपण सभागृत का मांडल्या नाहीत, असा सवाल धिरज देशमुखांनी उपस्थित केला. निवडणुका लढवत असताना आपले व्हिजन असले पाहिजे. शेतकरी दोनदा फेल गेलेले बेणे तिसऱ्यांदा कधीच आपल्या शेतात लावत नाही असा टोला ही याप्रसंगी देशमुखांनी विरोधकांना मारला.
याप्रसंगी महाविकास आघाडीतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
