काँग्रेसच्या काळातच दलितांवर सर्वाधिक अत्याचार-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
संविधान बदलण्याचा भ्रम पसरविणाऱ्यांना शिक्षा देण्याचे आवाहन
लातूर/प्रतिनिधी: काँग्रेसच्या काळातच दलितांवर सर्वाधिक अत्याचार झाले.त्यावर उपाययोजना केल्या नाहीत.सत्ता असताना काँग्रेसने काय दिवे लावले ? असा सवाल करत राहुल गांधी यांना संविधानाची माहिती नाही.केवळ सत्ता मिळविण्यासाठी संविधान बदलाचा भ्रम या पक्षाने पसरवला.या माध्यमातून जनतेची फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्या,असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
लातूर शहर मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या प्रचारार्थ शहरातील शाहू चौक येथे आयोजित सभेत आठवले बोलत होते.या सभेस माजी खासदार अमर साबळे, डॉ.सुनिल गायकवाड,उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे,माजी अध्यक्ष शैलेश लाहोटी,राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते ॲड.व्यंकट बेद्रे, प्रशांत पाटील,शिवसेनेचे ॲड. बळवंत जाधव,जितेंद्र बनसोडे,मोहसीन शेख यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना रामदास आठवले म्हणाले की,काँग्रेसची राजवट भ्रष्टाचाराने बरबटलेली होती. त्याच काळात दलितांवरही अत्याचार घडत गेले.आता सत्ते बाहेर असताना काँग्रेस आरोप करत आहे.पण केंद्रात मोदींच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडी व राज्यात महायुती सरकार आपल्या हितासाठी काम करत आहे.नरेंद्र मोदी हे ॲक्टिव्ह पंतप्रधान आहेत.बौद्ध समाज आणि दलितांना न्याय देण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे.मागील ८ वर्षांपासून मी मंत्रिमंडळात आहे.मोदी यांनी संविधानाला नतमस्तक होत कारभार हाती घेतला.सर्वधर्म समभाव जोपासणारा भारत तयार करण्यासाठी ते काम करत आहेत.एक ओबीसी व्यक्ती तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले असल्याचेही आठवले म्हणाले.
त्यांनी सांगितले की,भाजपाने लातूरमधून उच्चशिक्षित,डॉक्टर उमेदवार दिला आहे.जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी अर्चनाताई पाटील चाकूरकर सक्षम आहेत.गोरगरीब व बेरोजगारांच्या समस्या त्या सोडवतील.शहरातील पाणी व कचऱ्यासंदर्भात विधानसभेत आवाज उठवण्याचे काम त्यांच्याकडून केले जाईल,असेही आठवले म्हणाले.
बौद्ध धर्मात कमळाला अत्यंत महत्त्व आहे.हेच कमळ भाजपाचे निवडणूक चिन्ह आहे.त्यामुळे छत्रपती शिवराय.डॉ.बाबासाहेब आंबेडकर व शाहू महाराजांना स्मरत डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना निवडून आणा, असे आवाहनही आठवले यांनी केले.माजी खासदार डॉ.सुनिल गायकवाड यांनी सांगितले की, काँग्रेस पक्ष जातीयवादी आहे. त्याच पक्षाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पराभूत करण्याचे पाप केले होते.त्यामुळे आपण काँग्रेसला मतदान न करता भाजपा उमेदवाराला विजयी करावे,असे आवाहनही त्यांनी केले.ॲड.बळवंत जाधव म्हणाले की,ही निवडणूक महायुती व महाविकास आघाडीची नाही तर महायुती विरुद्ध देशमुख अँड देशमुख कंपनीचा उमेदवार यांच्यात लढत होत आहे.
काँग्रेसने लोकसभेला दलिता ऐवजी लिंगायताला उमेदवारी दिली.या माध्यमातून स्वतःच्या हितासाठी लिंगायत समाजाचा गळा दाबण्याचे काम केले. काँग्रेसकडे दलित मताला किंमत नाही.ही मते विकत घेऊ असे त्यांना वाटते.आपल्या मताची विक्री करू नका,असे आवाहनही जाधव यांनी केले.ॲड.व्यंकट बेंद्रे बेंद्रे यांनी काँग्रेस पक्ष लोकभावनेपासून दूर गेला असल्याचे सांगत नेतृत्वाचा अहंकारही वाढला असल्याचे म्हटले.देश अहंकाराने घडत नाही त्यासाठी दृष्टी असावी लागते. काँग्रेसचा अहंकार उतरवण्याची संधी आपल्याला चालून आली आहे.ही संधी दवडू नका,असेही ते म्हणाले.
महायुतीच्या उमेदवार डॉ.
अर्चनाताई पाटील चाकूरकर म्हणाल्या की,आज सर्वत्र गाजत असलेली लाडकी बहिणी योजना ही अत्यंत कमी कालावधीत राबविण्यात आली.आजच पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित झाला असून त्यात लाडक्या बहिणीसाठी यापुढे २१०० रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.या लाडक्या बहिणींमुळे महायुतीचा विजय होणार आहे. शहरातील ८६ हजार महिलांना योजनेचा लाभ मिळाला असून त्या महायुतीलाच मत देणार असल्याचे ताईंनी सांगितले. जिल्हा रुग्णालयाला जागा देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.त्यासाठी निधीही मंजूर केला.परंतु आपल्या आमदारांनी त्यासाठी पाठपुरावा केला नाही.हा निधी आजही पडून आहे.कामासाठी पाठपुरावा करणारा आमदार नसणे ही लातूरची शोकांतिका आहे. लोकप्रतिनिधीचे वर्तन पोषक नसते तेव्हा परिवर्तन करावे लागते,असेही ताई म्हणाल्या. आपणास राजा बनण्यासाठी मतदानाचा अधिकार दिला आहे, दलाल बनण्यासाठी नाही असे सांगून लातूरला दहशतमुक्त, भयमुक्त करण्यासाठी महायुतीला विजयी करा.तुमच्या सोबत राहणाऱ्याला विजयी करा,असे आवाहनही डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी केले.
देविदास काळे,जितेंद्र बनसोडे,प्रविण सुडे,संदेश सोनकांबळे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.ॲड.विजय अवचारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या सभेस चंद्रकांत बिराजदार, ॲड.दीपक मठपती,प्रविण सावंत,ॲड.दिग्विजय काथवटे, प्रमोद गुडे,गणेश गवारे,शिवसिंह शिसोदिया,विवेक बाजपाई,मंगेश बिराजदार,अनिल गायकवाड, महेश कौळखेरे यांच्यासह भाजपा महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

पहिला वार माझ्यावर होईल- डॉ.अर्चनाताई पाटील
या सभेत बोलताना डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर म्हणाल्या की,मी तुमच्यातलीच आहे.उदगीर हे माझे माहेर आहे. एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात माझा जन्म झाला. सरकारी महाविद्यालयात मी शिक्षण घेतले.अनेक अडचणींचा सामना केला.इतरांच्याही अडचणी पाहत मोठी झाले.या अडचणी सोडवण्याची संधी मला हवी आहे.तुमच्यावर कुठलीही अडचण आली तर मी तुमच्यासोबत नाही तर तुमच्या पुढे असेन.तुमच्यावर आघात झाला तर तो वार मी झेलेन. लोकशाहीचा प्रतिनिधी निवडून देण्यासाठी मला विधानसभेत पाठवा,असे आवाहनही डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी या सभेत बोलताना केले.