• Wed. Apr 30th, 2025

…तर पहिल्या १०० दिवसांत धिरज भैय्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण करु

Byjantaadmin

Nov 10, 2024

…तर पहिल्या १०० दिवसांत धिरज भैय्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण करु

खासदार सुप्रिया सुळेंचा महिला मेळाव्यात शब्द, आमदार धिरज देशमुख यांच्या भाषणाचे केले कौतुक
लातूर / प्रतिनिधी
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्या १०० दिवसांत धिरज भैय्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले. त्याचबरोबर त्यांनी आमदार धिरज देशमुख यांच्या भाषणाचेही कौतुक केले. धिरजभैय्यांना पहिल्यांदाच त्यांच्या मतदारसंघात ऐकले. एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेल्या भाषणाला माझा मानाचा मुजरा, अशा शब्दांत त्यांनी गौरव केला.

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या प्रचारासाठी आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे, आमदार धिरज विलासराव देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई देशमुख, रीड लातूरच्या संस्थापक अध्यक्षा दीपशिखा देशमुख, स्वयंप्रभा पाटील, सुनिता आरळीकर, आशा भिसे, शिला पाटील, दैवशाला राजमाने यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

त्या पुढे म्हणाल्या, महाराष्ट्राची संस्कृती पुरोगामी विचाराची आहे. परंतु भाजपने महाराष्ट्रातील पक्ष फोडले, घर फोडले. आमचा पक्ष गेला, चिन्ह गेले, नेते गेले, महामंडळे गेली, सगळे गेले. परंतु जनता आमच्यासोबत राहिली आणि लोकसभेत महाविकास आघाडीचे खासदार जनतेने निवडून दिले. या सरकारने फक्त घरे फोडली नाहीत तर येथील उद्योग इतर राज्यात पळवून नेले. आमच्या बेरोजगारांच्या ताटातला घास हिसकावण्याचे पाप यांनी केले असल्याची जहरी टीका त्यांनी केली.

काँग्रेस पक्षाने देशाला इंदिरा गांधींसारख्या पंतप्रधान दिल्या. राजकारणात महिलांसाठी सोनिया गांधी यांनी ५० टक्के आरक्षण दिले. लातूर काँग्रेसने सुद्धा आरक्षण नसताना महिलांना जिल्हा परिषद अध्यक्ष पद, महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर, कारखान्याच्या चेअरमन, बँकेत संचालक म्हणून संधी दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

विलासरावांना अभिमान वाटला असता
खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आदरणीय विलासराव देशमुखसाहेबांची आठवण काढून त्यांना अभिवादन केले. या मातीने खूप मोठा सुपुत्र महाराष्ट्र दिला आहे. आदरणीय वैशालीताई यांची त्यांना साथ होती. आदरणीय साहेबांचे विचार, त्यांचा आदर्श, समर्थ वारसा त्यांचे तीन सुपुत्र या ठिकाणी चालवत आहेत. धिरजभैय्यांचे अप्रतिम भाषण ते एक आदर्श लोकप्रतिनिधी असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले. त्यांनी ज्या-ज्या मागण्या केल्या आहेत. त्या सगळ्या मागण्या मी वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या सरकारचा शपथविधी झाल्यावर पहिल्या १०० दिवसांत सगळ्या मागण्या पूर्ण करणार आणि त्याची अंमलबजावणी करणार असल्याचा शब्द त्यांनी दिला.
हे लाडकं नव्हे लबाड सरकार- धिरज देशमुख
भाजपने अदृश्य शक्तीच्या माध्यमातून महायुतीचे सरकार जनतेवर लादले आहे. परंतु आमच्यावर आई तुळजाभवानी व महालक्ष्मीचा आशीर्वाद आहे. महाविकास आघाडीचे सरकार या ठिकाणी निवडून येणार आहे, असा विश्वास आमदार धिरज देशमुख यांनी व्यक्त करत काँग्रेसने काय केले असा प्रश्न विरोधक विचारतात. परंतु, दहा वर्षांमध्ये राज्य सरकारने व केंद्र सरकारने काय केले हे सांगा असा जाब त्यांनी विचारला. महायुती सरकारने फक्त भ्रष्टाचार, बेरोजगारी, महिला अत्याचार यात महाराष्ट्र एक नंबरवर नेऊन ठेवला आहे. हे लाडकं नाही तर लबाड सरकार आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

दिल्लीप्रमाणे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा व्हाव्यात, आरोग्य व्यवस्था प्राथमिक आरोग्य केंद्र, बचत गटाला शून्य टक्के व्याज, ग्रामपंचायतीमध्ये महिलांना उद्योगासाठी जागा उपलब्ध करणे तसेच बचत गटांना शासनाच्या विविध वस्तू निर्मितीमध्ये सहभाग वाढविणे, गावामध्येच केजी टू पीजी शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रयत्न करण्याची विनंती केली.

भाजपमुळे विकृत मानसिकता वाढली- प्रणिती शिंदे
खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपा युती सरकारवर जोरदार हल्ला चढवला. जिजाऊ, सावित्रींचा, अहिल्याबाईंचा महाराष्ट्र जो पुरोगामी विचारधारेवर चालतो, त्या महाराष्ट्रामध्ये आज चार-चार वर्षाच्या लहान मुलींवर अत्याचार आणि अन्याय होत आहेत. एकीकडे लाडकी बहीण म्हणून महिलांना तीन हजार रुपयांची लाच देत आहेत. तर दुसरीकडे त्याच लाडक्या बहिणीच्या चिमुरडीवर अन्याय, अत्याचार होतात. ही विकृत मानसिकता भाजपमुळे वाढली आहे. भाजप यासाठी दोषी असल्याचा आरोप करत भाजपला आता मते मागण्याचा अधिकार नसल्याचा घणाघात प्रणिती शिंदे यांनी यावेळी केला.

लाडकी बहीण योजनेवर बोलताना शिंदे पुढे म्हणाल्या, भाजपने निवडणुकीच्या तोंडावरच ही लाडकी बहीण चालू कशी केली. मागच्या तीन वर्षात लाडक्या बहिणाचा का विसर पडला होता? असा सवाल केला. ते आधी टेबलाच्या खालून पैसे द्यायचे आता टेबलाच्या वरून पैसे देत असल्याची टीका प्रणिती शिंदे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed