• Wed. Apr 30th, 2025

महायुती सरकारकडून धनगर समाजाची फसवणूक-भूषणराव राजे होळकर

Byjantaadmin

Nov 7, 2024

महायुती सरकारकडून धनगर समाजाची फसवणूक-भूषणराव राजे होळकर 

निलंगा येथे महाविकास आघाडीचा धनगर समाज मेळावा संपन्न

निलंगा : सन २०१४ मध्ये बारामती येथे धनगर समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी हजारो धनगर बांधव उपोषणाला बसले होते. त्या ठिकाणी तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी उपोषणस्थळी भेट देऊन युती सरकारला निवडून द्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतो असे अश्वासन देऊन संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाजाचे मतदान मिळवले. मात्र मागच्या दहा वर्षात अनेक कॅबिनेट बैठका झाल्या एकाही बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत एक ब्र शब्दही काढला नाही. सरळसरळ धनगर समाजाची फसवणूक करण्याचे काम महायुती सरकारने केल्याचा आरोप अहिल्याबाई होळकर यांचे वंशज भूषणराव राजे होळकर यांनी केला. 

 निलंगा विधानसभा काॅग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार अभय साळुंके यांच्या प्रचारार्थ येथील वृंदावन मंगल कार्यालयात आयोजित धनगर समाज मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी आ. रामहरी रुपणवर, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, काॅग्रेस डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ अरविंद भातांब्रे, माजी प.स सभापती अजित माने, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, आबासाहेब पाटील, ईस्माईल लदाफ, लक्ष्मण कांबळे, शेतकरी संघटनेचे राजकुमार सस्तापुरे, मिथुन दिवे, महेश देशमुख, अजित नाईकवाडे, गोविंद सूर्यवंशी अदी उपस्थित होते.

पुढे बोलताना भूषणराव राजे म्हणाले महागाई, बेरोजगारी, शेतीमालाला भाव नाही, तरुणाच्या हाताला काम नाही. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान धोक्यात आले आहे. तरुणाई नैराश्यातून जीवन जगत आहे. हि परीस्थिती बदलण्यासाठी आपणाला आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे टाकायचे आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघातील सर्व धनगर व इतर समाज बांधवानी अभय साळुंके यांना आशिर्वाद द्यावेत असे आवाहन त्यांनी केले. सुत्रसंचलन प्रा डॉ गजेंद्र तरंगे, आभार अजित निंबाळकर यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने निलंगा विधानसभा मतदारसंघातील धनगर समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अभय सोळुंके लढवय्या कार्यकर्ता-सलगर

              कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एका गरीब शेतकरी कुटुंबातील अभय साळुंके यांच्या रुपाने काॅग्रेस पक्षाने उमेदवारी देऊन गरीबांचा सन्मान केल्याचे सक्षणा सलगर यांनी सांगत ‘अब राजा का बेटा राजा नही बनेंगा, जो हक्कदार होगा वही राजा बनेंगा’ असे सांगत विद्यमान महायुती सरकारने आरक्षणाच्या नावाखाली धनगर समाजाची फसवणूक केली. जातीजातीत भांडण लावण्याचे काम केले. त्यामुळे या सरकारला अद्दल घडवण्यासाठी व लोकशाही जिवंत आहे हे दाखवून देण्यासाठी अभय साळुंके लढवय्या कार्यकर्त्याला निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed