• Wed. Apr 30th, 2025

डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या पाठीशी राहणार कार्यकर्ता संवाद मेळाव्यात शिवाजीराव पाटील कव्हेकरांची ग्वाही

Byjantaadmin

Nov 7, 2024

डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या पाठीशी राहणार कार्यकर्ता संवाद मेळाव्यात शिवाजीराव पाटील कव्हेकरांची ग्वाही

लातूर/प्रतिनिधी :
लातूर शहर मतदार संघातून अजित पाटील कव्हेकर यांच्यासह अनेकांनी उमेदवारी मागितली होती. पक्षाने विविध बाजूंचा सारासार विचार करत डॉ.
अर्चनाताई पाटील चाकूरकर यांची उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही देत माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी डॉ. अर्चनाताई पाटील यांच्या विजयासाठी मैदानात उतरण्याचे आज जाहीर केले.
‘कैलास’ निवासस्थानी बुधवारी सकाळी शहर मतदार संघातील भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना शिवाजीराव पाटील बोलत होते. या मेळाव्यास महायुतीच्या उमेदवार डॉ.
अर्चनाताई पाटील चाकूरकर, शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, सरचिटणीस दिग्विजय काथवटे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष रागिनीताई यादव, लालासाहेब देशमुख, डॉ. मन्मथआप्पा भातांब्रे, ज्योतीराम चिवडे, अजय भूमकर, आबा चौगुले, अनंत गायकवाड, बाबासाहेब कोरे, सूर्यकांत शेळके, मौलाना फेरोज पटेल आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना कव्हेकर म्हणाले की, डॉ. चाकूरकर यांची उमेदवारी जाहीर झाल्या नंतर मी स्वतः व अजित पाटील यांनी खुल्या मनाने त्याचे स्वागत केले. पक्ष नेतृत्वाशी संवाद साधत कार्यकर्त्यांच्या भावना त्यांच्या कानावर घालाव्या एवढीच आमची इच्छा होती. त्यानुसार पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची समाधानकारक चर्चा झाली.
महायुतीच्या उमेदवार डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या विजयासाठी आम्ही काम करणार आहोत, असे सांगून राज्यातील व देशातील सरकारच्या कामांमुळे ही निवडणूक आपण जिंकणार असल्याचा विश्वास कव्हेकर यांनी व्यक्त केला.
लातूर शहराला विकसित शहर करण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध आहोत. याउलट १९८० पासून घरात सत्ता असताना देशमुख परिवाराने लातूरचा कसलाही विकास केला नसल्याची टीका कव्हेकर यांनी केली. आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पाठपुराव्यातून देवेंद्र फडणवीस यांनी लातूर येथे बोगी कारखान्यासाठी पाठपुरावा करत तो मंजूर करून घेतला. यामुळे युवकांना रोजगाराची संधी निर्माण झाल्याचेही कव्हेकर म्हणाले. शिवराज पाटील चाकूरकर, शिवाजीराव पाटील निलंगेकर, गोपीनाथराव मुंडे व प्रमोद महाजन हे माझे आदर्श आहेत. चाकूरकरांच्या विचारातून आपल्याला ऊर्जा मिळते, असेही कव्हेकर म्हणाले.
यावेळी बोलताना उमेदवार डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी उमेदवारीसाठी आम्ही दावेदार असलो तरी प्रत्येकामध्ये संवाद होता. अजित पाटील हे आम्हा इच्छुक उमेदवारांमध्ये सर्वात लहान आहेत. त्यांना झालेला त्रास मी समजू शकते. परंतु त्यांचे मन मोठे आहे.आमच्यात कसलेही मतभेद व मनभेद नाहीत. कव्हेकर व चाकूरकर परिवाराचा पहिल्यापासून स्नेह आहे. कव्हेकर चाकूरकरांचा किती सन्मान करतात ते मी पाहत आले आहे. त्यामुळे त्यांची साथ मोलाची असल्याचे डॉ.
अर्चनाताई पाटील म्हणाल्या.
प्रास्ताविकात अजित पाटील कव्हेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून भाजपाचा विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी मी काम करतो. भारताला विकसित राष्ट्र बनवणे हे आपणा सर्वांचे ध्येय आहे. त्यामुळे पक्षाने एकदा उमेदवारी जाहीर केल्यानंतर आमच्यात स्पर्धा नाही. ताईंच्या पाठीशी आपण सर्वजण खंबीरपणे उभे राहू. ही निवडणूक चाकूरकर, कव्हेकर व देशमुखांची नाही तर समस्त लातूरकरांची आहे. विकासाच्या बाबतीत लातूर मागे पडले आहे. लातूरचा विकास आपणास करायचा आहे. डॉ. अर्चनाताई पाटील या प्रवासी नव्हे तर निवासी आमदार असतील. उमेदवारी मिळण्याची वेळ आल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या संस्थेची बदनामी करण्यात आली. माझ्याबाबतही असेच झाले होते पण आता लातूरकरांना अशा बाबी कळून चुकल्या आहेत. जनता बदलासाठी तयार आहे.आपला विजय निश्चित आहे. केवळ आपल्या संपर्काची, कार्यकर्त्यांना पक्षाच्या स्पर्शाची गरज आहे. अशक्य ते शक्य करून दाखवण्याची धमक भाजपात आहे. अर्चनाताईंना विजयी करण्याचा विडा आपण उचलला आहे.स्वतःच्या विजयासाठी जेवढे पळालो असतो त्यापेक्षा दहापट अधिक मेहनत करून ताईंना विजयी करू,असे आश्वासनही अजित पाटील कव्हेकर यांनी दिले.
शहराध्यक्ष देविदास काळे, मौलाना फेरोज पटेल यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. या मेळाव्यास शहर विधानसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.


  • यंदाची ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची आहे. मतदारांना विविध प्रलोभन आणि दहशत निर्माण करून भीती घालण्याचे काम सुरू आहे. मतदार व कार्यकर्त्यांनी कसलीही भीती बाळगू नये. धनशक्तीच्या विरोधातल्या लढाईत जनशक्तीचा नक्कीच विजयी होईल, असा विश्वास डॉ. अर्चनाताई पाटील यांनी व्यक्त केला.
    देशमुख परिवाराला पक्षाशी ईमानदारीची सवय नाही – कव्हेकर ..
    अमित देशमुख हे लोकप्रतिनिधी नाहीत तर ते कंपनी चालक आहेत. १९८० ते २०२४ पर्यंत अनेक वर्ष मुख्यमंत्रीपद व इतरही मंत्रिपदे त्यांच्या घरात होती पण त्यांना जनतेची अपेक्षापूर्ती करता आली नाही. पाण्याचा प्रश्न ते सोडवू शकले नाहीत.या परिवाराला पक्षाशी इमानदारी करण्याची सवय नाही. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या विरोधातही कायम त्यांनी काम केले. औशातून बसवराज पाटील यांना पराभूत करण्यासाठी त्यांनी काम केल्याचा आरोपही कव्हेकर यांनी मेळाव्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed