लातूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघात १०६ उमेदवार निवडणूक लढविणार– जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
लातूर, दि. ०४ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात १९३ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत यापैकी ८७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने १०६ उमेदवार निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, आदर्श आचारसंहिता कक्षाच्या नोडल अधिकारी कल्पना क्षीरसागर, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अप्पासाहेब चाटे यांच्यासह पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यासोबतच आदर्श आचारसंहितेचा भंग होवू नये, यासाठी विविध पथकांद्वारे कार्यवाही सुरु आहे. २० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील २ हजार १४३ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून यासाठी मतदान पथके गठीत करण्यात आली आहेत. यासोबतच इतरही अनुषंगिक तयारी पूर्ण करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले. भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक यांचे जिल्ह्यात आगमन झाले असून लातूर शासकीय विश्रामगृह येथे त्यांचे कार्यालय राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस विभागामार्फत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी यावेळी माहिती दिली. विविध कारवायांमध्ये दाखल गुन्हे, तसेच निवडणूक काळात अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम यांनी २९ ऑक्टोबर २०२४ अखेर मतदारसंख्या, जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्रांची माहिती दिली.
क्र | विधानसभा मतदारसंघ क्र. व नाव | वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची संख्या | उमेदवारी मागे घेतलेल्या उमेदवारांची संख्या | निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या |
1 | 234 – लातूर ग्रामीण | 37 | 19 | 18 |
2 | 235 – लातूर शहर | 34 | 11 | 23 |
3 | 236 – अहमदपुर | 42 | 22 | 20 |
4 | 237 – उदगीर (अजा) | 22 | 09 | 13 |
5 | 238 – निलंगा | 22 | 09 | 13 |
6 | 239 – औसा | 36 | 17 | 19 |
एकूण | 193 | 87 | 106 |
******
