• Wed. Apr 30th, 2025

स्वातंत्र्य चळवळीत भटक्या विमुक्त समाजाचे मोठे योगदान ;भटक्या विमुक्त समाज मेळाव्यात आमदार धिरज देशमुख यांचे प्रतिपादन

Byjantaadmin

Nov 6, 2024

स्वातंत्र्य चळवळीत भटक्या विमुक्त समाजाचे मोठे योगदान ;भटक्या विमुक्त समाज मेळाव्यात आमदार धिरज देशमुख यांचे प्रतिपादन

लातूर / प्रतिनिधी –

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात भटक्या विमुक्त समाजाचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये अठरापगड जाती धर्मांनासोबत घेत स्वराज्य निर्माण केले. त्या काळामध्ये जातीवाद नव्हता. छत्रपती शिवरायांच्या काळापासून स्वातंत्र्य चळवळीपर्यंत भटक्या विमुक्त समाजाचे योगदान असल्याचे प्रतिपादन लातूर ग्रामीण मतदारसंघाचे उमेदवार आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केले.

लातूर येथे आयोजित भटक्या विमुक्त समाज मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख होते. व्यासपीठावर यशवंतराव पाटील, संतोष देशमुख, बाळासाहेब कदम, बादल शेख, जितेंद्र स्वामी, बख्तावर बागवान, रमेश साळुंखे, मेळाव्याचे आयोजक प्रा. सुधीर अनवले, राजकुमार होळीकर, अॅड. आतश चिकटे, हरिभाऊ गायकवाड आदींसह मान्यवर उपस्थित होते.

धिरज देशमुख पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना एकच मताचा अधिकार दिलेला आहे. श्रीमंताच्या मताची किंमत आणि गरिबाच्या मताची किंमत ही एकच आहे. आपल्या मतामध्ये पंतप्रधानांनाही प्रश्न विचारण्याची ताकद आहे. आपण गरीब आहोत. परंतु देशाच्या एकूण जीएसटीतील ७४% कर इथला गरीब माणूस भरतो. या गरीब माणसांनीच देश उभा केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

महाविकास आघाडी सरकार आपल्या हातातील कोयता काढून कलम आणण्याचे काम करेल, आपल्या हक्कासाठी आम्ही लढू. लोकसभेत तुम्ही काँग्रेस पक्षाला आशीर्वाद दिले. मागच्या वेळेसही मी आपल्या मताच्या ताकदीवर आमदार झालो, असे म्हणत उपस्थित समाज बांधवांचे त्यांनी आभार व्यक्त केले. आम्ही निश्चित आपला विकास करू, मी आपला एक भाऊ म्हणून सांगतो असा शब्दही त्यांनी या प्रसंगी दिला व येणाऱ्या २० तारखेला काँग्रेस पक्षाच्या चिन्हा समोरील बटन दाबून आपणास प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

आदिवासी, भटके विमुक्त हे देशाचे मूळ रहिवासी
देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली. परंतु अपेक्षित विकास समाजाचा झाला नाही. काँग्रेस पक्ष आपले प्रश्न सोडवल्याशिवाय थांबणार नाही. खऱ्या अर्थाने देशाचे मूळ रहिवासी हे आदिवासी आणि भटके विमुक्त आहेत, असे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी म्हटले. आपले शैक्षणिक प्रश्न, सामाजिक प्रश्न, स्थानिक प्रश्न, कायद्यातील सुधारणा त्यातील बदल आगामी काळामध्ये आम्ही निश्चित करू. इंग्रजांनी केलेल्या कायद्यात बदल करणे आवश्यक आहे. यासाठी लोकसभेत आपला प्रश्न मांडू, असे सांगून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र दिला आहे. तो आपण अंमलात आणावा. निश्चित आपली मदत करू.काँग्रेस पक्षांने वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक यांसारख्या बहुजन समाजातील व्यक्तींना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले असे सांगून आदरणीय लोकनेते विलासराव देशमुख यांची परंपरा आपण पुढे नेऊयात. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही असा शब्द त्यांनी उपस्थित समाज बांधवांना दिला.

मुलामुलींसाठी वसतीगृह उभे करणार

शिक्षणाशिवाय समाजाचा विकास होणार नाही. यासाठी भटक्या विमुक्त जाती-जमातीतील मुला-मुलींसाठी सुविधा व्हावी, यासाठी लातूर शहरामध्ये जागा उपलब्ध करुन समाजातील मुले आणि मुलींसाठी वसतीगृह आम्ही उभा करू असे आश्वासन देत हा माझा जाहीरनामा आहे असे दिलीपराव देशमुख म्हणाले व आमदार धिरज देशमुख यांना पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती सर्वांना केली.

काँग्रेसमध्येच आमचे अस्तित्व

आम्ही एकनिष्ठ आहोत, काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वातच आमचे अस्तित्व आहे. देशमुख परिवार हे सावली आणि फळ देणांरे झाड आहे. आमचे जगण्याचे प्रश्न सुटले पाहिजेत. अॅट्रासिटी कायद्याचे संरक्षण आम्हालाही मिळाले पाहिजे. भटक्या विमुक्तांचे वकील पत्र आपण घ्यावे, अशी मागणी या मेळाव्याचे संयोजक प्रा. सुधीर अनवले यांनी याप्रसंगी केली.या भटक्या विमुक्त समाज मेळाव्यामध्ये माती वडार, गाडी वडार, जोशी, भिल्ल, कोल्हाटी, मसनजोगी, कैकाडी, घिसाडी, वैदू, पंचनवाले, रायंदर, लोहार, वासुदेव, डवरी, गोसावी, कोल्हाटी, बंडी धनगर या समाजातील असंख्य समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते.यावेळी गोपाळ सरवदे, मारुती झाकणीकर, दादा भोसले, नामदेव हाके, हरिभाऊ गायकवाड, रमेश साळुंखे, बक्तावर बागवान, संतोष गायकवाड, धनंजय देशमुख, अभिमान भोळे, मकबुल वलांडीकर, रामभाऊ राठोड, सतीश कांबळे यांच्यासह विविध समाजातील नागरीक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *