• Wed. Apr 30th, 2025

लातूर मतदारसंघात परिवर्तन घडविण्यासाठी शक्ती द्या- डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन

Byjantaadmin

Nov 6, 2024

लातूर मतदारसंघात परिवर्तन घडविण्यासाठी शक्ती द्या- डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन

     लातूर/प्रतिनिधी: गेल्या कांही वर्षात लातुरचा विकास खुंटला आहे.शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात नावलौकिक असणारे लातूर मागे पडत आहे. इतर शहरांच्या बरोबरीने लातूरचा विकास करण्यासाठी परिवर्तनाची गरज असून त्यासाठी महायुतीला साथ द्या,असे आवाहन लातूर विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ.
अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी केले.
मंगळवारी परशुराम पार्क परिसरातील खटके फार्म येथे छत्रपती संभाजी राजे मंडळाच्या वतीने आयोजित मेळाव्यात डॉ.अर्चनाताई पाटील बोलत होत्या.या मेळाव्यास भाजपाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी,माजी  नगरसेवक सुनिल मलवाड,बाबू खंदाडे, लालासाहेब देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन दाने यांच्यासह मंडल अध्यक्ष चंद्रकांत खटके व मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना अर्चनाताई पाटील चाकूरकर म्हणाल्या की, लातूर हे आजही विकसनशील शहर आहे. शहराचा विकास करण्याची संधी आपल्याला चालून आली आहे.अनेक वर्ष सत्ता उपभोगणाऱ्या आणि मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांना विकास करण्याची मोठी संधी होती परंतु त्यांनी तो केला नाही.कोट्यवधी रुपयांचा निधी आणला असे सांगत फलक उभारण्याचे काम त्यांनी केले पण वास्तवात रस्ता नसल्याने अनेकांचे जीव गेले.विकासासाठी निधी आणला तर तो गेला कुठे ? असा सवालही ताईंनी उपस्थित केला.
कोरोना महामारीत नागरिक संकटात होते, त्यावेळी त्यांना मदतीची गरज होती.त्या काळात १४ कारखाने ताब्यात असणाऱ्यांनी इंजेक्शन, ऑक्सिजन अथवा लस देण्याची सोयही केली नाही.यावरूनच त्यांची मानसिकता लक्षात येते, असेही ताई म्हणाल्या.या नेत्यांनी लिंगायत समाजालाही नादाला लावले.ऋणनिर्देश मेळावे आयोजित केले.हा मेळावा नेमका कशाचा? समाजाला आजवर प्रतिनिधीत्व नाकारल्याचा आहे काय ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
 आपण कासवाच्या गतीने जात आहोत. यावेळी निश्चितपणे परिवर्तन होणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने काळजीपूर्वक आपल्या बुथवर लक्ष द्यावे.आपल्या बुथवरील ८५ वर्षापेक्षा अधिक वयाचे वृद्ध आणि दिव्यांगांचे मतदान करून घेण्याची व्यवस्था करावी. ही मते आपल्यालाच मिळणार असल्याचेही डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यावेळी बोलताना म्हणाल्या.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना शैलेश लाहोटी म्हणाले की,मागील १५  वर्षात केलेल्या कामांपैकी ठळक ५ कामेही  विद्यमान लोकप्रतिनिधी सांगू शकत नाहीत. भाजपाची मनपात सत्ता असताना शहरात शौचालयांची उभारणी केली,रस्ते निर्माण केले. आमदारांना विलासराव देशमुख यांच्या नावे असणारा मार्ग तयार करता आला नाही.
२०१६साली लातूरमध्ये  दुष्काळ पडला.त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरकरांसाठी रेल्वेने पाण्याची सोय केली असे सांगून या निवडणुकीत डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून येतील, असा विश्वास लाहोटी यांनी व्यक्त केला.सरंजामशाही मोडून काढत लोकशाही प्रस्थापित करण्याची संधी या निवडणुकीच्या निमित्ताने आली असल्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन दाने यांनी सांगितले.शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शेळके यांनी राज्यातील शिंदे सरकार हे लोककल्याणकारी सरकार असून अर्चनाताईंच्या विजयात शिवसेना मोलाचा वाटा उचलेल असे आश्वासन दिले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले.या मेळाव्यास बंटी बोमणे,बाबू वडगावे, रामभाऊ वडगावे,व्यंकट पन्हाळे,पांडुरंग खटके, अंजली खटके,रेणुका खटके,यशराज खटके, वैभव खटके,सागर खटके,सचिन खटके, विनायक खटके,केदार पाटील,राजू गुरमे, यांच्यासह मंडळातील बुथ प्रमुख,पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed