मुंबई : महाविकास आघाडीकडून मुंबईत आयोजित करण्यात मोर्चाच्या सांगता सभेत बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप नेत्यांचा जोरदार समाचार घेतला आहे. ‘बऱ्याच वर्षांनंतर एवढा मोठा मोर्चा महाराष्ट्राने आणि देशाने पाहिला असेल. ज्यावेळी या मोर्चाची घोषणा केली तेव्हा काही जणांनी तुम्ही या मोर्चात चालणार का, असं मला विचारलं. मी तेव्हाच सांगितलं होतं की, केवळ मोर्चात चालणार नाही तर मी आणि लाखो महाराष्ट्रपेमी हे महाराष्ट्रद्रोह्यांच्या छाताडावर चालणार आहोत. हे चालणं प्रतिकात्मक आहे. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी आपल्याला डिवचलं, त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच ती वेळ आहे,’ असं म्हणत उद्धव यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर पुन्हा एकदा खरमरीत शब्दांत हल्ला चढवला आहे. ‘आज सर्व पक्ष एकवटले आहेत, फक्त महाराष्ट्रद्रोही वेगळे आहेत. राज्यपाल हटवा, ही आमची मागणी आहे. खरंतर भगतसिंह कोश्यारी यांना मी आता राज्यपाल मानतच नाही. त्या खुर्चीचा मी सन्मान करतो. मात्र तिथे कोणीही बसावं आणि कोणालाही टपल्या माराव्यात, हे सहन केलं जाणार नाही. केंद्रामध्ये बसणाऱ्यांच्या घरी काम करणाऱ्या माणसाला कुठेतरी पाठवून द्यायचं, हे चालणार नाही. राज्यपाल हे राष्ट्रपतींचे दूत असतात. मात्र ते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, महात्मा फुलेंबद्दल, सावित्री फुलेंबद्दल अवमानकारक बोलत आहेत,’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, संयुक्त महाराष्ट्रानंतरचा हा सर्वात मोठा लढा आहे. आता बेळगाव महाराष्ट्रात आणल्याशिवाय आपण शांत बसणार नाही, असा निश्चयही यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.