मुंबई:-महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून आज मुंबईत महामोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केली जाणारी वादग्रस्त विधानं, महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न आणि राज्यातून बाहेर जाणारे उद्योगधंदे यासंदर्भात राज्यातील एकनाथ शिंदे सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, संजय राऊत यांनी सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपावर परखड शब्दांत हल्लाबोल केला. मात्र, हा विराट मोर्चा नव्हता, असा दावा करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यावर खोचक टीका केली आहे.
“खरंतर आजचा मोर्चा हा केवळ राजकीय मोर्चा आहे. जे लोक संतांना शिव्या देतात, देवदेवतांना शिव्या देतात, वारकरी संप्रदायाला शिव्या देतात, ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे, कुठल्या साली झाला हे माहिती नाही अशी मंडळी कोणत्या तोंडानं आज हा मोर्चा काढत आहेत? महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारे महापुरुषांचा अपमान होऊच नये, या मताचे आम्ही आहोत. तो कुणी करत असेल, तर ते योग्य नाही हे वारंवार सगळ्यांनी सांगितलं आहे. पण जाणीवपूर्वक त्याचा राजकीय मुद्दा केला जातोय”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
दरम्यान, मविआकडून महामोर्चामध्ये उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यावर फडणवीसांनी यावेळी उत्तर दिलं. राज्यपालांची हकालपट्टी करण्याची मागणी मविआकडून करण्यात आली. त्यासंदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता देवेंद्र फडणवीसांनी योग्य वेळी केंद्र सरकार निर्णय घेईल, असं सांगितलं. “याबाबत केंद्र सरकार योग्य वेळी निर्णय घेईल”, असं ते म्हणाले.