कार्यकर्त्यांचा शब्द खाली पडू देणार नाही -डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर
- लातूर/प्रतिनिधी: विधानसभेची ही निवडणूक माझी नाही, पक्षाची नाही तर कार्यकर्त्यांची आहे. कार्यकर्तेच या निवडणुकीत विजय मिळवून देणार आहेत. निवडणुकीतील विजय कार्यकर्त्यांचाच असून तुम्ही मला साथ द्या,मी तुमचा शब्द कधीही खाली पडू देणार नाही,असे आश्वासन लातूर मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी दिले.
स्वामी दयानंद सरस्वती मंडळाच्या वतीने आयोजित महायुतीच्या मेळाव्यात डॉ.चाकूरकर बोलत होत्या.या मेळाव्यास महिला मोर्चा अध्यक्षा रागिनीताई यादव,माजी शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी,माजी नगरसेविका स्वातीताई घोरपडे,राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते ॲड.व्यंकट बेद्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन दाने,अविनाश कोळी,युवा मोर्चाचे गणेश गोमसाळे,ॲड.दिग्विजय काथवटे,सुनिल मलवाड, मंडल अध्यक्ष अमोल गीते,रिपाइंचे डी.ई. सोनकांबळे,भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे मोहसीन शेख यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना डॉ.अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, निवडणुकीतील विजय हा कार्यकर्त्यांचा असतो. त्यामुळे मी आमदार झाले तर तुम्हीही आमदार होणार आहात.विजय मिळाला तर माझ्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा शब्द मी कधीही खाली पडू देणार नाही.निवडणुकीतील विजयासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे,असे त्या म्हणाल्या.
ताईंनी सांगितले की, मतदारसंघात एकूण ३८८ बूथ आहेत.मागील निवडणुकीत उमेदवार शैलेश लाहोटी यांना जवळपास ७५ हजार मते मिळाली होती.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपाला ९६ हजार मते मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र व राज्य सरकारने केलेल्या कामामुळे ही मते वाढली. आता यात आणखी वाढ करावी लागणार आहे. प्रत्येक बुथवर १०० पेक्षा अधिक मते वाढावीत यासाठी आपण काम करू.हाच विजयाचा मंत्र आहे.आपण काम केले तर निश्चितपणे मताधिक्य मिळणार आहे,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बुथ प्रमुख हा पक्षाचा कणा आहे.त्यांच्या अडचणी सोडविण्यास मी तत्पर आहे.या निवडणुकीत बुथवर काहीही होऊ शकते. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी खंबीर रहावे.ही लढाई दुष्ट प्रचार व षडयंत्रांच्या विरोधात असून असे षडयंत्र हाणून पाडा,असे आवाहन त्यांनी केले.
लातूर शहर मतदार संघ मॅनेज आहे असा फेक निगेटिव्ह पसरवण्यात येत होता. याचा फटका शैलेश लाहोटी यांना बसला. आता हा नरेटीव्ह पुसून काढण्यासाठी ही लढाई आहे.मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे लातूरच्या जागेकडे विशेष लक्ष आहे,असे ताई म्हणाल्या. लातूर मतदारसंघात ४ लाख मतदारांमध्ये १ लाख ९६ हजार महिला मतदार आहेत.त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे.या भगिनींशी संपर्क साधत त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करणे आवश्यक आहे.शहरातील प्रत्येक बूथ ए प्लस राहील यासाठी काम करा.ज्या पद्धतीने मतांची टक्केवारी वाढेल त्याचप्रमाणे त्या बुथची विजयातील टक्केवारीही वाढेल,असे ताई म्हणाल्या.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ॲड.बेद्रे यांनी बुथवर काम करणारा कार्यकर्ता हा संघटनेचा डोळा असल्याचे मत व्यक्त केले.महायुतीच्या उमेदवार डॉक्टर असून त्या फक्त रुग्णाला दुरुस्त करत नाहीत तर गरज पडल्यास भूल सुद्धा देतात असे सांगितले. आम्ही मैदान सोडून पळत नाही,पळपुटे सरदार नाही आणि कुठल्या कारणाने फुटतही नाही असे सांगून मिळालेली सत्ता समन्वयाने आणि लोककल्याणासाठी वापरावी लागते,असे मत ॲड.बेद्रे यांनी व्यक्त केले.
शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन दाने यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रचार कसा करता येईल ?या संदर्भात मत मांडले. अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष मोहसीन शेख यांनी सरकारच्या योजना कुठल्याही जातीसाठी नाही तर सर्वांसाठीच असल्याचे सांगितले.
स्वातीताई घोरपडे, ॲड.दिग्विजय काथवटे यांनीही मनोगत व्यक्त केले.मंडल अध्यक्ष अमोल गीते यांनी या मंडळात ५२ बुथ व १५ शक्तिकेंद्र असल्याची माहिती देत सर्व बुथ प्लस करण्यासाठी काम करू, असे सांगितले.
मेळाव्याचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन गणेश गोमसाळे यांनी केले. जमलेल्या प्रत्येकाने आपल्या लाडक्या बहिणीला विजयी करण्याची शपथ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी असंख्य युवकांनी डॉ.अर्चनाताई पाटील यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश केला. चौकट …
‘कॉंग्रेसची परिस्थिती चिंताजनक’
आपल्या भाषणात डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात लातूर शहर विधानसभेची जागा अति चिंताजनक असल्याचे समोर आले आहे.या संदर्भात मोबाईलवर आलेल्या संदेशाचा स्क्रीनशॉटही आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे विरोधक हादरले आहेत. अपप्रचार, दुष्प्रचार, मतभेद व मनभेदाचे तंत्र अवलंबले जाण्याची भीती आहे. माझ्या सर्व सहकार्यांनी दक्ष रहावे. मतदारांना विविध माध्यमातून प्रलोभने दाखवली जात आहेत, तसेच दडपण आणून पक्षप्रवेश केले जात असल्याचेही निदर्शनास येत आहे, असे डॉ.अर्चनाताई पाटील म्हणाल्या.
