• Tue. Apr 29th, 2025

लातूरच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

Byjantaadmin

Nov 6, 2024

लातूरच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

  कव्हा येथील तलावाच्या विकासासाठी १०० कोटींचा प्रस्ताव दाखल करण्याचेही आश्वासन

    लातूर/प्रतिनिधी: लातूर शहर आणि परिसरातील गावांच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट माझ्याकडे तयार आहे. त्यासाठी आवश्यक असणारी तयारीही केली आहे असे सांगून कव्हा येथील तलावाला हैदराबाद येथील बंड गार्डनच्या धर्तीवर विकसित करता येऊ शकते.त्यासाठी राज्य सरकारकडे १०० कोटी रुपयांचा प्रस्ताव दाखल करू,असे आश्वासन लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी दिले. मंगळवारी सकाळी डॉ.अर्चनाताई पाटील यांच्या वतीने खोपेगाव व कव्हा येथे पदयात्रांचे आयोजन करण्यात आले होते.पदयात्रेनंतर कव्हा येथे आयोजित मेळाव्यात डॉ.अर्चनाताई पाटील बोलत होत्या.या मेळाव्यास दिग्विजय काथवटे,प्रविण सावंत, अविनाश कोळी,गणेश गवारे,लालासाहेब देशमुख,बाबू खंदाडे,गोपाळ वांगे, पृथ्वीसिंह बायस, मीनाताई गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
 डॉ.अर्चनाताई पाटील म्हणाल्या की,३हजार ५०० किलोमीटर प्रवास करून परदेशातील फ्लेमिंगो पक्षी कव्हा येथील तलावावर येतात. पण आपल्या भागाचे नेते फ्लेमिंगो पाहण्यासाठी परदेशात जातात.आपल्या परिसरात येणाऱ्या पक्षांची माहितीही त्यांना नाही.त्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही.
कव्हा या गावाचे ऐतिहासिक व भौगोलिक महत्त्व मला ठाऊक आहे. त्यामुळेच या परिसराच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दाखल करण्याचे मी ठरवले आहे, असे त्या म्हणाल्या.
 डॉ.अर्चनाताई पाटील यांनी सांगितले की,कव्हा येथील तलावाचे सुशोभीकरण झाले तर पर्यटनात वाढ होईल. त्यामुळे गाव व परिसरात विविध व्यवसाय वाढतील.यातून संपूर्ण परिसराचा विकास होईल, रोजगार निर्मिती होईल. तरुणांच्या हाताला काम मिळेल,असे माझे नियोजन आहे.विरोधक मात्र तरुणांना बिघडवण्याचे काम करत असल्याचे ताई म्हणाल्या.
राज्य सरकारने योजनांचा लाभ देताना कधीही जात पाहिली नाही.विरोधक केवळ जातीवरच बोलत आहेत. सरकारने महिलांना लाडकी बहीण योजना दिली.बस प्रवासात ५०  टक्के सवलत दिली. बाळंतपणासाठी ६ हजार रुपयांची मदत दिली.या योजना महिलांना समजावून सांगा.या निवडणुकीत महिलांची भूमिका महत्त्वाची आहे. महायुती सरकारच्या विजयासाठी लाडक्या बहिणींनी कंबर कसली असल्याचे त्या म्हणाल्या.सावत्र भाऊ अपप्रचार करत असल्याने सख्या भावाला निवडून देण्यासाठी बहिणी सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना बाबू खंदाडे यांनी हे गाव आपल्यावर प्रेम करत असल्याचे सांगितले. विरोधी उमेदवार खोटे बोलतात.इतरांनी आणलेल्या निधीचे श्रेय घेणारे फलक लावतात. त्यांनी मतदारसंघाचा नव्हे तर स्वतःचा विकास केला आहे.महिला भगिनी या निवडणुकीत स्टार प्रचारक आहेत,असेही ते म्हणाले.
मेळाव्याचे प्रास्ताविक गोपाळ वांगे यांनी केले. लालासाहेब देशमुख, दिग्विजय काथवटे यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन बाबू खंदाडे यांनी केले.या मेळाव्यास कव्हा येथील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खोपेगाव येथील पदयात्रेत महिला मोर्चाच्या अध्यक्षा रागिनीताई यादव, शोभाताई कोंडेकर यांच्यासह भाजयुमो सचिव लक्ष्मण मोरे,बुथ प्रमुख अमोल वाघमारे, दामोदर शिंदे,प्रल्हाद मोरे, संभाजी मोरे,हनुमंत पवार,भरत वाघमारे यांच्यासह गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.


भावजय नव्हे बहीणच – अर्चनाताई
   कव्हा येथील पदयात्रेत एका भगिनीची भेट घेताना महिला मंडळीतून भावजय नणंदेच्या भेटीसाठी आली असल्याचा उल्लेख झाला होता.हाच धागा पकडत डॉ.अर्चनाताई पाटील यांनी आपण भावजय नाही तर बहीण म्हणून तुम्हाला भेटण्यास आलो असल्याचे सांगितले.सर्व महिला माझ्या भगिनी आहेत.महिलांवरच घर अवलंबून असते.तसेच या निवडणुकीतील विजय महिलांवरच अवलंबून असल्याचे त्या म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed