महायुती’ला बाहेरचा रस्ता दाखवण्याची वेळ आली -आमदार धिरज देशमुख यांचे सरकारवर टीकास्त्र; काँग्रेसने लातूरची ओळख निर्माण केल्याचे दिलीपराव देशमुख यांचे प्रतिपादन
लातूर/प्रतिनिधी-
काँग्रेसने सत्तेचा वापर नेहमी लोकहितासाठी, सर्व समाजघटकांच्या विकासासाठी केला. आपल्या जिल्ह्याला, राज्याला पुढे नेण्याचे काम काँग्रेसने केले. मात्र, सत्तेसाठी राजकारण करणाऱ्या भाजप सरकारच्या काळात शेतकरी, सुशिक्षित युवक, महिला, विद्यार्थी व विविध समाजघटकांना आपल्या न्याय हक्कासाठी, मागण्यांसाठी आंदोलने करावी लागली. जनतेच्या हक्काच्या मागण्यांना दाद न देता आकर्षक योजनांच्या माध्यमातून सत्तेची पोळी भाजू पाहणाऱ्यांना या निवडणुकीतून बाहेरचा रस्ता दाखवावा, असे आवाहन लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केले.
ते पानगाव (ता. रेणापूर) येथे आयोजित संवाद बैठक मेळाव्यामध्ये बोलत होते. याप्रसंगी माजी मंत्री तथा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, लातूर ग्रामीणचे माजी आमदार त्रिंबक भिसे, आबासाहेब पाटील, प्रमोद जाधव, यशवंतराव पाटील, सर्जेराव मोरे, अनंतराव देशमुख, सुरेश लहाने, अनुप शेळके, उमाकांत खलंग्रे, शिवाजी आचार्य, प्रदीप राठोड, व्यंकटराव चव्हाण, विश्वास देशमुख, प्रभाकर केंद्रे, संभाजी रेड्डी, अजमुद्दीन मनियार, चंद्रचूड चव्हाण, चंद्रकांत आरडले, धनराज देशमुख, शिवाजी आचार्य, हनुमंतराव चव्हाण, उत्तरेश्वर हलकुडे, बाळकृष्ण माने, श्रीनिवास आकनगिरे, दत्तात्रय रामबोळे, सिद्धेश्वर गालफाडे आदींसह रेणा साखर कारखान्याचे व रेणापूर बाजार समितीचे सर्व संचालक यावेळी उपस्थित होते.
ते म्हणाले, महायुती सरकारच्या कारभाराला वैतागलेल्या जनतेने लोकसभा निवडणुकीत आपला कौल दिला. संविधान वाचवणे, शेतकरी, युवक, महिलांचे मुलभूत हक्क अबाधित ठेवणे गरजेचे होते. यामुळे सुज्ञ जनतेने महायुती सरकारच्या सत्तेला लगाम घातला. या निवडणुकीत जे नेहमी चिन्ह, नेता आणि विचार बदलतात त्यांच्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करत त्यांनी आमचे एकच चिन्ह, एकच नेता आणि विकासाचा विचार आहे. हा विचार पुढे घेऊन आपल्याला सर्वांगीण विकास करायचा आणि महाराष्ट्र घडवायचा असल्याचे आमदार धिरज देशमुख यांनी म्हटले.
महायुती सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले- माजी मंत्री दिलीपराव देशमुख, अलीकडे राजकारण बदलले आहे. मात्र सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाणारा काँग्रेस पक्षाचा विचार आहे. काँग्रेस पक्षाने विविध समाजघटकांना राज्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली. मात्र अलीकडे समाजात ध्रुवीकरण करण्याचे काम सुरू आहे. हा डाव जनतेने ओळखून विकासासाठी दृष्टी असणाऱ्यांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे. सध्या माणसा-माणसातील विश्वास संपला आहे, हेच देशाला घातक आहे. समाजा-समाजाला एकत्र ठेवण्यासाठी, देश पुढे घेऊन जाण्यासाठी काँग्रेस व महाविकास आघाडीच्या विचाराला बळ द्यावे.
काँग्रेसने महिलांचे सबलीकरण केले. शेतकरी, मजूर, व्यापारी अशा सर्व घटकांचा विचार करून धोरणे राबविली. लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांचा विकासाचा वारसा पुढे घेऊन जायचे. याच काँग्रेसने लातूरची एक ओळख तयार केली. आर्थिक सक्षम केले, समाजात आपली मान उंचावण्याचे काम केले. येणाऱ्या काळात या विचाराच्या मागे जनतेने उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले. सत्तेच्या खुर्चीच्या नादात जनतेला महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. भाजपच्या लोकांनी झाडाच्या शेंड्यावर बसून झाड तोडण्याचे काम केले आहे. येणाऱ्या निवडणुकीत ते खाली पडतील. येणाऱ्या काळात सर्वसामान्यांची बाजू घेऊन लढू, जनतेच्या प्रश्नांना साद देऊन त्यांचे स्थानिक प्रश्न सोडवू, आपल्या भागाचा विकास करू, असेही ते म्हणाले. याप्रसंगी जगन्नाथ राचुरे, विनोद मोहाडे, अॅड. मोहन सिरसाठ, विश्वासराव देशमुख, सुनील भंडारे, बब्रुवान भंडारे, चंद्रकांत झुंजारे, शेंडगे, जगन्नाथ नरहारे, व्यंकटराव काका चव्हाण, यशवंत पाटील, हणमंतराव चव्हाण, दत्तात्रय रामरुळे, सिद्धेश्वर गालफाडे, बब्रुवान हाणवते आदी उपस्थित होते.
