महाराष्ट्राला अडचणीतुन आपल्याला बाहेर काढायचे यासाठी महाविकास आघाडीचे सरकार येणे आवश्यक आहे
माजी मंत्री काँग्रेसचे स्टार प्रचारक आमदार अमित विलासराव देशमुख
अहमदपूर येथील महाविकास आघाडीची प्रचार शुभारंभ सभा संपन्न
लातूर (प्रतिनीधी) : मंगळवार दि. ५ नोव्हेबर २४
शेतीच्या विरोधात भाजपने काळे कायदे आणले, शेतकऱ्यांनी विरोध केल्यावर ते कायदे रद्द केले. असाच
कारभार राज्यात महायुतीने केला. यामुळे त्यांच्या काळात राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरु असून
यासाठी सरकारने काहीही केले नाही. सध्या महाराष्ट्र अडचणीत आहे, या महाराष्ट्राला अडचणीतुन आपल्याला
बाहेर काढायचे आहे, हे काम करण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणे आवश्यक आहे, असे माजी
मंत्री काँग्रेसचे स्टार प्रचारक आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.
मंगळवार दि. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी अहमदपूर शहरातील निजवंते नगर येथे २३६ अहमदपूर-चाकूर विधानसभा
मतदारसंघातील महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार विनायकराव
किशनराव जाधव-पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची प्रचार शुभारंभ सभा संपन्न झाली.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे, परभणीचे खासदार संजय
जाधव, लातूरचे खासदार डॉ.शिवाजी काळगे, माजी खासदार सुधाकरराव शृंगारे, ह भ प किशन महाराज,
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार
पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष संजय शेटे, लातूर शहराध्यक्ष राजा मणियार, सय्यद साजिद, निळकंठ मिरकले,
पंडितराव धुमाळ, विलास पाटील चाकूरकर, दत्ता हेंगणे, डॉ. गणेश कदम, चंद्रकांत मद्दे आदिसह महाविकास
आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी मंत्री काँग्रेसचे स्टार प्रचारक आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, या परिसरातील
शेतकऱ्यांच्या उसाचा प्रश्न खूप जिव्हाळ्याचा आहे. मांजरा परिवार उसाचे एकही टिपरू शिल्लक ठेवणार नाही.
शेतकऱ्यांच्या उसाला मांजरा परिवाराप्रमाणे भाव देण्यात येईल, अहमदपूरमध्ये विद्यमान आमदाराने काहीच
विकास केला नाही, त्यांना आता धडा शिकवा. महाविकास आघाडीच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभे रहावे,
शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, सध्या सोयाबीनला भाव नाही, महाविकास आघाडीचे सरकार राज्यात
आल्यावर शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देण्यासाठी राज्यात कायदा करू, सामान्य माणसाला अभिप्रेत
असलेले शासन आम्ही देऊ असे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, महायुती सरकारने महाराष्ट्र, मुंबई विकायला काढली आहे. अहमदपूर, चाकूर
तालुक्यातील विकास कामासाठी विनायक पाटील सक्षम असून ते अनुभवी आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या
अजूनही थांबलेल्या नाहीत. शेतीच्या विरोधात भाजपने काळे कायदे आणले, शेतकऱ्यांनी विरोध केल्यावर ते
कायदे रद्द केले. सध्या महाराष्ट्र अडचणीत आहे, या महाराष्ट्राला अडचणीतुन आपल्याला बाहेर काढायचे आहे,
हे काम करण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीचे एक्य आहे. भाजपने सत्तेत राहून फक्त फोडाफोडीचे
राजकारण केले, महाराष्ट्राची सूत्र आता गुजरातकडे आहेत महाराष्ट्राची अस्मिता आपणाला जपायची आहे.
सध्या महाविकास आघाडीचे वारे वाहू लागले आहे काँग्रेस नेते कार्यकर्त्यांनीही महाविकास आघाडीच्या
विजयासाठी अहोरात्र मेहनत घ्यावी येत्या 20 नोव्हेंबरला ईव्हीएम मशीन वरील क्रमांक दोन वरील अहमदपूर-
चाकूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत
उमेदवार विनायकराव किशनराव जाधव-पाटील यांच्या नावासमोरील तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या
चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.
माजी मंत्री काँग्रेसचे स्टार प्रचारक आमदार अमित विलासराव देशमुख
यांचे रुद्धा हेलिपॅड येथे अहमदपूर महाविकास आघाडी पदाधिकाऱ्याकडून स्वागत
माजी मंत्री काँग्रेसचे स्टार प्रचारक आमदार अमित विलासराव देशमुख यांचे आज मंगळवार दिनांक 5 नोव्हेंबर
रोजी दुपारी अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
पक्षाचे अधिकृत उमेदवार विनायकराव किशनराव जाधव पाटील यांच्या प्रचार सभेसाठी अहमदपूर नजिकच्या
रुद्धा हेलिपॅड येथे आगमन झाले असता महाविकास आघाडी पदाधिकाऱ्याकडून त्यांचे स्वागत करण्यात आले.
