मुंबई:-केंद्र सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची लवकरात लवकर हकालपट्टी केली नाही, तर महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.
मविआच्या महामोर्चात शरद पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी गलिच्छ शब्द बोलण्याऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना लाज वाटायला हवी. केंद्र तसेच राज्य सरकारने या महामोर्चाची नोंद घ्यायला हवी. महामोर्चानंतरही त्यांनी भगतसिंह कोश्यारींना पदावर कायम ठेवल्यास सरकारला लोकशाही मार्गाने धडा शिकवल्याशिवाय हा महाराष्ट्र राहणार नाही.
शरद पवार म्हणाले, 70 वर्षांपूर्वी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी मुंबईत लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले होते. हौतातम्य पत्कारण्यासाठी अनेक तरुण समोर आले. आज मुंबईसह महाराष्ट्र झाला असला तरी बेळगाव, निपाणी, कारावार अजूनही महाराष्ट्रात येण्याची प्रतीक्षा आहे. या भागांचा महाराष्ट्रात समावेश व्हावा, ही तेथील गावकऱ्यांची भावना या महामोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाईल.
शरद पवार म्हणाले, आज महाराष्ट्राच्या सन्मानावर हल्ले होत आहेत. त्यामुळेच आज लाखोंच्या संख्येने आपण एकत्र आलो आहोत. महाराष्ट्राच्या सन्मानासाठी आपण सर्व एकत्र आलो आहोत. आपल्याला महाराष्ट्र ही एकत्र आणणारीर शक्ती आहे. मात्र, आज ज्यांच्या हातात महाराष्ट्राची सुत्रे आहेत, जे सत्तेवर आहेत, ते वेगळी भाषा वापरत आहेत.
महाराष्ट्राच्या भावना तीव्र
शरद पवार म्हणाले, आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबतच महाराष्ट्रातील मंत्रीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वाट्टेल ते बोलत आहेत. शिवछत्रपतींनंतर अनेक राजे होऊन गेले, संस्थाने झाली. मात्र, साडेतीनशे वर्षांनंतरही समस्त महाराष्ट्रवासीयांच्या मनात एक नाथ अंखड धगधगत आहे. ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आमच्या या दैवतांचा अवमान आम्ही सहन करणार नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काही बोलले त्याविषयी महाराष्ट्राच्या भावना तीव्र आहेत. त्याची वेळीच दखल घेऊन भगतसिंह कोश्यारींची राज्यपाल पदावरून हकालपट्टी केली नाही, तर लोकशाही मार्गाने धडा शिकवू, महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही.
शरद पवार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वजण महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यांच्याविषयी गलिच्छ शब्द बोलताना भगतसिंह कोश्यारींना लाज वाटायला हवी. स्त्रीशिक्षण, दलितांसाठी महात्मा फुलेंनी जे काम केले, त्यावरून अख्ख्या जगात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. अशा महापुरुषांबाबत भगतसिंह कोश्यारी बेताल वक्तव्य करत असतील, तर आम्ही ते सहन कसे करणार? महापुरुषांबाबत गलिच्छ शब्द वापरणाऱ्यांना धडा शिकवायच काम महाराष्ट्र करेल. या महामोर्चानंतरही सरकारने भगतसिंह कोश्यारींची हकालपट्टी केली नाही, तर हे सरकार उलथवून टाकण्यासाठी पूर्ण जोर लावू, असा इशाराही शरद पवार यांनी दिला.