ग्रामपंचायत मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
निलंग्याचे तहसीलदार अनुप पाटील यांची माहिती
निलंगा: तालुक्यातील ६२ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले असून २२९ मतदान केंद्र, १४ झोनल अधिकारी, २८ निवडणूक निर्णय अधिकारी व २८ सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ६२ ग्रामपंचायतीसाठी १ लाख २६ हजार ९६ मतदार आपला हक्क बजावणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अनुप पाटील यांनी दिली.
तालुक्यातील एकूण ६८ ग्रामपंचायत पैकी कलांडी,
अनसरवाडा, वाडी, कासारसिरसी, ममदापूर, मानेजवळगा, बोरसुरी या निवडणूक सहा ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्याने तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतीसाठी रविवारी ता. १८ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. एकूण ६४४ ग्रामपंचायत सदस्यांपैकी १४१ सदस्य बिनविरोध निघाल्याने केवळ ४९७ जागेसाठी प्रत्यक्ष निवडणूक पार पडणार असून ६ जागेसाठी एकही अर्ज नसल्याने त्या जागा रिक्त राहणार आहेत. ६८ पैकी ७ सरपंच बिनविरोध निवडून आले असून केवळ ६१ ठिकाणी सरपंचपदाकरीता लढत होणार आहे. ६१ जागेसाठी १८२ उमेदवार रिंगणात उभे आहेत.
प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून एकूण २२९ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. २६ मतदान केंद्राधिकारी राखीव ठेवण्यात आली असून याकामी १४ झोनल अधिकारी व २८ निवडणूक निर्णय अधिकारी व २८ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, मतदान केंद्रावर निवडणूक मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी असे एकूण एक हजार २० जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. ६२ ग्रामपंचायतीसाठी १ लाख २६ हजार ९६ मतदार आपला हक्क बजावणार असून त्यात ६६ हजार ९९३ पुरुष मतदार तर ५९ हजार १०३ महिला मतदारांची संख्या आहे.
जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज, निवडणूक निरीक्षक श्री. बोरगावकर, अपर जिल्हाधिकारी नांदेड यांच्या उपस्थितीत गुरुवारी ता. १५ रोजी आढावा घेण्यात आला. बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुचिता शिंदे, उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कोल्हे तहसीलदार अनुप पाटील, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, नायब तहसीलदार, घनश्याम अडसूळ, अरुण महापुरे उपस्थित होते.