निलंगा, शिरुर अनंतपाळ, देवणी येथे एमआयडीसी उभारणार -अभय साळुंके
शिरूर अनंतपाळ : दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत चालली असून सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींची संख्या वाढत आहे. आपल्या परिसरात त्यांच्या हाताला काम नसल्याने कामाच्या शोधात आजची तरुणाई पुणे, मुंबई अशा ठिकाणी रोजगार शोधत आहे. अनेक जणांच्या घरची परिस्थिती हालाकीची असल्याने दुय्यम दर्जाचे काम करत वडापाव खाऊन तरुण दिवस ढकलत गावाकडे ते चार पैसे पाठवून देत आहेत. या तरुणांना आपल्याच तालुक्याच्या ठिकाणी हाताला काम देण्यासाठी निलंगा, शिरुर-अनंतपाळ व देवणी येथे एमआयडीसीची उभारणार असल्याचा शब्द काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार अभय साळुंके यांनी दिला.

निलंगा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिरुर अनंतपाळ तालुक्यातील तळेगाव (बोरी), हालकी, डोंगरगाव, बिबराळ, उमरदरा, कासलेवाडी, भिंगोली आदी गावांमध्ये आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी माजी प.स. सभापती अजित माने, काँग्रेस तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील उजेडकर, लक्ष्मण कांबळे, पंकज शेळके, सुतेज माने, बाळासाहेब पाटील, प्रमोद भदरगे, अशोक कोरे, संजय बिराजदार, देविदास जाधव, नंदू हाजबे, रामकिशन गड्डीमे, ज्ञानेश्वर पाटील, शकील पटेल आदी उपस्थित होते. पुढे बोलताना अभय साळुंके म्हणाले, आपल्या मतदारसंघाचे विद्यमान आमदार मागच्या २० वर्षापासून सत्तेवर आहेत. गल्ली ते दिल्ली त्यांची सत्ता होती. मात्र त्यांनी आपल्या भागातील तरुणांचा विचार केला नाही म्हणून त्यांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रात कोठेही गेले की एमएच २४ म्हणजे लातूर जिल्हा म्हणून आपली ओळख होती. मात्र मंत्री संजय बनसोडे यांनी आरटीओचे कार्यालय उदगीर येथे घेऊन जात त्यात शिरुर-अनंतपाळ तालुक्याचा समावेश केल्याने शिरुर-अनंतपाळची ओळख आता एमएच ५५ अशी झाली आहे. यापुढे आपणाला गाडीची पासिंग करुन घेण्यासाठी लातूर ऐवजी उदगीरला जावे लागणार आहे. आपले आरटीओचे कार्यालय उदगीरला जात असताना आपल्या आमदार महोदयांनी एक ब्र शब्दही काढला नाही. आपल्या शिरूर अनंतपाळ तालुक्याची पुसलेली ओळख आपणाला परत मिळविण्यासाठी संघर्ष करणार, असा शब्द त्यांनी उपस्थितांना दिला.