महाराष्ट्राच्या अस्मितेची निवडणूक, लढायची आणि जिंकायची आमदार धिरज देशमुख यांचा निर्धार; लातूरमध्ये ठरतं, तेच महाराष्ट्रात घडतं
लातूर : प्रतिनिधी शेतकरी, बेरोजगार तरुण, महिला सुरक्षा कायदा व सुव्यस्था टिकवण्यासाठी ही विधानसभेची निवडणूक आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेची ही निवडणूक असून, या निवडणुकीत लढायचे आणि जिंकायचे, असा निर्धार लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी बोलून दाखविला. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीत लातूरचा आवाज बुलंद झाला पाहिजे, असे सांगताना लातूर जे ठरवतं, तेच महाराष्ट्रात घडतं, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखविला.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे आज आयोजित केलेल्या ऐतिहासिक प्रचारसभेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी सहकार मंत्री दिलीपराव देशमुख होते. यावेळी लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे, माजी खासदार सुधाकर शृंगारे, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, खा. इब्राहीम प्रतापगडी, अमर खानापुरे, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, श्रीमती वैशालीताई देशमुख, सौ. अदिती देशमुख, सौ. दीपशिखा देशमुख, उल्हासदादा पवार, माजी महापौर डॉ. स्मिता खानापुरे, निलंगा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अभय साळुंके, काँग्रेस पक्ष निरीक्षक कुणाल चौधरी, अॅड. किरण जाधव, अॅड. प्रमोद जाधव, जगदीश बावणे, मोईज शेख, आबासाहेब पाटील, धनंजय देशमुख, सर्जेराव मोरे, उदय गवारे, श्रीपतराव काकडे, विक्रांत गोजमगुडे, विजय देशमुख, रवी काळे, अब्दुल सत्तार, घटक पक्षाचे नेते आदींसह असंख्य मान्यवर उपस्थित होते.
आमदार धिरज देशमुख पुढे म्हणाले की, लातूर शहरात होत असलेली ही ऐतिहासिक सभा व रॅली मोठ्या उत्साहात होत आहे. त्यामुळे लातूर जे ठरवतं, तेच महाराष्ट्रात घडतं, असा विश्वास त्यांनी आपल्या ओजस्वी व भारदस्त वाणींने उपस्थित जनसमुहाला दिला. महायुती सरकारने शेतकऱ्यांची अवस्था दयनिय केली आहे. सोयाबीनला भाव नाही, युती सरकारमध्ये दररोज नव्या-नव्या घोषणा दिल्या जातात. पण मराठवाडा ही आमची ताकद आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, रोजगार निर्मितीचे प्रश्न सुटले पाहिजेत. महाविकास आघाडी सरकारने वैद्यकीय प्रवेशातील ७०-३० चा निर्णय रद्द केला. धाराशिवला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज दिले. परंतु युती सरकार हे फक्त जाहिराती देण्याचे काम करीत असून, या सरकारने तब्बल २०० कोटी रुपये नुसत्या जाहिरातींवर खर्च केल्याचा आरोप त्यांनी केला.
लाखाच्या फरकाने येणारा आमदार लातूरचाच असतो, हे आम्ही सिद्ध करून दाखवले आहे. आता महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आम्हाला ही निवडणूक लढायची आहे, नुसती लढायची नाही तर ती जिंकायची आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जो कोणी काँग्रेसचा नाद करेल, त्याचा आम्ही नाद केल्याशिवाय राहणार नाही असे सांगत आपल्या भाषणाची सांगता त्यांनी जय हिंद, जय शिवराय, जय भीम अशी केली. आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या दमदार व जोशपूर्ण भाषणाने सभास्थानी मतदारांमध्ये उत्साह निर्माण झाला.
सरकारकडून मराठवाड्याच्या भवितव्याशी खेळण्याचे काम
तुम्ही मराठवाड्याच्या भवितव्याशी खेळत आहात. मराठवाड्यातील मुला-बाळांच्या भविष्याशी तुम्ही खेळत आहात. जातीपातीचे राजकारण करणे हे यांचे धोरण आहे. पण छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे. छातीवर घेण्याची क्षमता आमच्यातही आहे, असा हुंकारही त्यांनी यावेळी भरला.
माजी खासदार शृंगारे यांना कॉंग्रेसमध्ये सन्मान मिळेल
भाजपाचे माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी आजच्या ऐतिहासिक सभेत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देत आमदार धिरज देशमुख यांनी आपला भाजपाने वापर करून घेतला. यावर हमे तो अपनो ने लूटा, गैरो मे कहॉं दम था, हमारी कस्ती जहॉं डुबी, वहॉं पानी कम था, असा शेर सुनावत भाजपने श्रृंगारे यांना सन्मानाने वागविले नाही. परंतु मी आपणास शब्द देतो की, कॉंग्रेसमध्ये आपणास स्वाभिमानाने वागवले जाईल आणि योग्य सन्मान दिला जाईल, असा विश्वास व्यक्त केला. माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी आज भाजपला सोडचिठ्ठी देत असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
मतदारांना अराजकता दूर करण्याची संधी- दिलीपराव देशमुख
भाजपची वृक्षवल्ली आपण लोकसभेमध्ये छाटलेली आहे. आता भाजपचे हे झाड मुळापासून तोडायचे आहे. मागील अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रात सरकार कोणाचे आहे, हेच कळत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रकारची अराजकता निर्माण झाली आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांनी ही अराजकता दूर करायची आहे, असे प्रतिपादन सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले.
ते म्हणाले, कायदा सुव्यवस्था नाही, शेतकऱ्यांना न्याय नाही. युवकांच्या हातांना काम नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आणावे लागेल. महाविकास आघाडीचे १८० आमदार निवडून आणावे लागतील आणि हे तुमच्या हातात आहे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. कार्यकर्त्यांनी आपल्या गावामध्ये राहून आपल्या बुथची काळजी घ्यावी. प्रत्येक गावात किमान ३०० मतांची आघाडी मिळायला हवी. यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज आहे. लातूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सहाच्या सहा उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कोण काय म्हणाले….
आमदार अमित देशमुख- मागील पाच वर्षांत आम्ही लातूर शहरासाठी २४०० कोटींच्या योजना आणल्या आहेत. कोणी टीका केली म्हणून आम्ही थांबणार नाही. जे मुद्दे नाहीत ते मुद्दे करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून होत आहेत. त्यापासून लातूरकरांनी सावध राहिले पाहिजे. विरोधकांची चर्चा करु नका, कारण ते चर्चेतच नाहीत.
खासदार डॉ. शिवाजीराव काळगे- लोकनेते विलासराव देशमुख साहेबांच्या दूर दृष्टीमुळे लातूर जिल्हा सुजलाम सुफलाम झाला आहे. संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या, पिकांना हमीभाव न देणाऱ्या महायुतील सरकारला धडा शिकवायचा आहे.
खासदार इम्रान प्रतापगडी- हे भाजपचे सरकार ना शेतकऱ्यांचे नाही ना युवकांचे आहे. हे सरकार कोणाचेच नाही. महाविकास आघाडीला सत्ता द्या. महाराष्ट्राचे सरकार महाराष्ट्रातील लोक चालवतील दिल्लीतील नाही.
खासदार ओमराजे निंबाळकर- मागच्या अडीच वर्षात महायुती सरकारने राज्याचे राजकारण खराब करुन टाकले आहे, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. शेतकऱ्यांचा विचार करायचा नाही, पक्ष फोडायचा आणि पक्षावरच मालकी दाखवायची अशी यांची निती आहे.
अभय साळुंखे- काँग्रेस पक्ष गरीबांचा आहे. काँग्रेसनेच लोकशाही दिली आहे. भविष्य ओळखा. अमित देशमुख हे महाराष्ट्राचे भविष्य आहेत. त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या.
रॅली आणि सभेतील काही क्षणचित्रे
– रॅली व प्रचार सभेसाठी जनसागर उसळला होता .
– महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. डॉ. बाबासाहेब आबेडकर उद्यान ही कमी पडले होते.
– वयोवृद्ध मंडळींचे प्रचार रॅलीत नृत्य
– आमदार अमित देशमुख, सौ. अदिती देशमुख, आमदार धिरज देशमुख, सौ. दीपशिखा देशमुख यांनी रॅलीमध्ये झेंडा फडकावत सर्वांचे लक्ष वेधले.
– रॅलीमध्ये व व्यासपीठावर असलेला जय-भीम लिहिलेला निळा ध्वज हा लक्षवेधी ठरला.
– सभा सुरु होण्यापूर्वी उपस्थितांनी महापुरुषांच्या पुतळ्यांना फुले अर्पण केले.
– महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे शिल्पकार दिवंगत माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, दिवंगत विलासराव देशमुखसाहेब, दिवंगत शिवाजीराव पाटील निलंगेकर, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले.
– सभेच्या सुरुवातीला शंखनाद करण्यात आला.
– अंकुश आरेकर यांच्या कवितांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
– रॅलीमध्ये पिवळा, निळा,भगवा आणि तिरंगा असे ध्वज या ठिकाणी लक्षवेधी ठरले
– ढोल ढोल ताशांचा गजर, तुतारीचा नाद, शाहीरांची शाहीरी व टाळयांच्या कडकडाटात उमेदवारांचे स्वागत झाले.
– भारदस्त आवाजातील पोवाडा या ठिकाणी लक्षवेधी ठरला.
