• Mon. Apr 28th, 2025

धनगर समाजाला महायुतीच आरक्षण देणार – आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा विश्वास 

Byjantaadmin

Oct 30, 2024

धनगर समाजाला महायुतीच आरक्षण देणार – आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा विश्वास 

वलांडी येथे धनगर समाजाचा मेळावा 

  निलंगा/प्रतिनिधी:

महायुती सरकारनेच धनगर समाजाचा सन्मान केला आहे.आरक्षणाचा प्रश्नही महायुती सरकारच निकाली काढेल.सरकार आल्यानंतर धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला जाईल,असा विश्वास आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिलाl. वलांडी येथील संगमेश्वर मंगल कार्यालयात निलंगा मतदारसंघातील धनगर समाजाचा मेळावा बुधवारी संपन्न झाला.या मेळाव्यात मार्गदर्शन करताना आ.संभाजीराव पाटील निलंगेकर बोलत होते.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विजयकुमार भोसले तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस संजय दोरवे, विधानसभा प्रभारी दगडू सोळुंके,निलंग्याचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे,देवणी तालुकाध्यक्ष काशिनाथ गरीबे,देवबा काळे,लक्ष्मण जागले,आण्णाराव गोबाडे, प्रकाश म्हेत्रे, प्रकाश कोटे, तुकाराम काळे, ब्रह्माजी भोसले, विजयकुमार जागले, नामदेव काळे,नागेश तरंगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मेळाव्याच्या प्रारंभी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.धनगर समाजाच्या वतीने काठी, घोंगडी व फेटा बांधून आ.निलंगेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आ.निलंगेकर म्हणाले की, मुघल सरकारने हिंदू संस्कृती मोडून काढली. ती जतन करण्याचे काम अहिल्यादेवी होळकर यांनी केले.स्वातंत्र्यानंतर ६० वर्षात काँग्रेसला त्यांचा सन्मान करता आला नाही.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचा योग्य तो सन्मान केला. राज्य सरकारनेही सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले तर अहमदनगरचे नाव बदलून ते अहिल्यानगर करण्यात आल्याचे आ. निलंगेकर म्हणाले.शरद पवारांनी मधुकर पिचड यांना हाताशी धरून धनगर व धनगड असा तांत्रिक मुद्दा उपस्थित केल्याचा आरोप आ.निलंगेकर यांनी केला.ही चूक महायुती सरकारने दुरुस्त केली. त्यामुळे आता धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या संदर्भात मी विधानसभेतही आवाज उठवला होता.भविष्यात महायुती सरकारच सत्तेत येणार असून या समाजाचा आरक्षणाचा विषय मार्गी लागेल,असेही ते म्हणाले.

आ.निलंगेकर यांनी सांगितले की,निलंगा मतदारसंघात समाजाला योग्य तो सन्मान देण्याचे काम आपण केले आहे.या समाजाला राजकीय पाठबळ दिले.निलंग्याच्या नगराध्यक्षपदी बाळासाहेब शिंगाडे, पंचायत समितीचे सभापती म्हणून शिवाजीराव चेंडकापुरे, लातूरच्या उपमहापौरपदी देविदास काळे यांना संधी दिली.यापुढे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. मतदारसंघातील गौडगाव येथे अहिल्यादेवींचा पुतळा उभारला.केळगाव व देवणी तालुक्यातील धनगरवाडी येथे लवकरच पुतळे उभारले जाणार आहेत.निलंगा शहरात अहिल्यासृष्टी उभारून समाजाचा सन्मान करण्याचे काम आपण केले आहे.आता मत विभागणीसाठी समाजाचा वापर केला जात आहे. विरोधकांच्या या डावापासून समाजाने सावध रहावे.राज्यात व निलंगा मतदारसंघातही महायुतीच्या पाठीशी रहावे,असे आवाहनही आ.निलंगेकर यांनी केले.

विजयकुमार भोसले म्हणाले की,काँग्रेस व राष्ट्रवादीने जातीपातीचे राजकारण केले. त्यांनीच धनगर व धनगड असा तांत्रिक वाद उपस्थित करून आरक्षणाचा प्रश्न जटील करून टाकला. भाजपाच्या नेतृत्वातील सरकारने त्यात दुरुस्ती केली आहे.महायुती सरकारच  समाजाला आरक्षण देऊ शकते. त्यामुळे समाजाने महायुतीच्या पाठीशी रहावे,असे आवाहनही त्यांनी केले.नामदेव पाटील व बाळासाहेब शिंगाडे यांचीही यावेळी भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुरलीधर अनसुले यांनी केले.या मेळाव्यास निलंगा मतदार संघातील धनगर समाज बांधव,भाजपाचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed