• Wed. Apr 30th, 2025

मविआ’च्या महामोर्चाला परवानगी:मुंबईत तब्बल अडीच हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त

Byjantaadmin

Dec 16, 2022

मुंबई:-महाविकास आघाडीच्या मुंबईत शनिवारी निघणाऱ्या महामोर्चाला अखेर पोलिसांनी परवानगी दिलीय, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते मुंबईत बोलत होते. मोर्चासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शिवाय ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीच्या मोर्चाला उत्तर म्हणून उद्या मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही आंदोलनाचा इशारा दिलाय. विशेष म्हणजे मुंबईतच हे आंदोलन केले जाणार आहे.

काय म्हणाले फडणीस?

मोर्चाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मोर्चा शांतपणे व्हावा. त्याला आवश्यक असणारी परवानगी दिली आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना विरोध करायचा अधिकार आहे. आम्ही सरकार म्हणून फक्त कायदा आणि सुव्यवस्था नीट राहिली पाहिजे हेच पाहू.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेले अवमानकारक वक्तव्य, सीमाप्रश्नी महाराष्ट्राची गळचेपी, सत्ताधाऱ्यांची महापुरुषांबत वादग्रस्त वक्तव्ये याच्या निषेधार्थ शनिवारी (१७ डिसेंबर) मुंबईत विरोधी पक्ष ‘संयुक्त महामोर्चा’ काढणार आहे. दुसरीकडे भाजपही ‘मविआ’च्या मोर्चाविरोधात प्रतिमोर्चा काढणार आहे. यापार्श्वभूमीवर प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

मविआ’च्या मोर्चाला तब्बल अडीच हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. मोर्चाच्या सुरक्षेची जबाबदारी दोन अतिरिक्त पोलिस आयुक्त चारे ते पाच पोलिस उपायुक्तांवर टाकण्यात आली आहे. मोर्चात एसआरपीएपच्या वाढीव तुकड्याही असतील. ड्रोनच्या माध्यमातून मोर्चावर लक्ष ठेवले जाणार आहे. दरम्यान, महाविकास आघाडीने आपल्या नेत्यांना संरक्षण देण्यासाठी तब्बल दीडशे सुरक्षा रक्षकांची टीम तयार केलीय. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रत्येक पन्नास सदस्य असणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *