अर्ज भरताना धिरज देशमुख यांनी समाजातील प्रश्नांकडे वेधले लक्ष;शेतकरी, मजूर, महिला, सुशिक्षित बेरोजगार युवकाची उपस्थिती
लातूर /प्रतिनिधी
केंद्र आणि राज्य सरकारच्या जाचक निर्णयांमुळे अडचणीत सापडलेले शेतकरी, मजूर, महिला, सुशिक्षित बेरोजगार युवक यांच्या उपस्थितीत काँग्रेस-महाविकास आघाडीचे ‘लातूर ग्रामीण’मधील अधिकृत उमेदवार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे उमेदवारी अर्ज दाखल करून समाजातील विविध प्रश्नांकडे (सोमवारी दि. 28) लक्ष वेधले.भारत निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर रोजी घोषित केलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघातील 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. अर्ज भरण्याची मुदत मंगळवार, दि. 29 पर्यंत आहे. त्यामुळे सोमवारी, दि. 28 काँग्रेस-महाविकास आघाडीचे ‘लातूर ग्रामीण’मधील अधिकृत उमेदवार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी माजी मंत्री, सहकार महर्षी श्री दिलीपराव देशमुख साहेब, लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे, माजी मंत्री श्री. अमित विलासराव देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, सौ. दीपशिखा धिरज देशमुख, लातूर ग्रामीणचे माजी आमदार वैजनाथ शिंदे, श्री दिलीपदादा नाडे जी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, पाशामियाँ शेख, शेतकरी हिरामण आडे, महिला शेतमजूर संगीता टेंकाळे आदी उपस्थित होते.
सरकारच्या जाचक निर्णयामुळे शेतकरी शेतमजूर आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. सुशिक्षित तरुणांच्या हाताला काम नाही. त्यामुळे जगावे कसे, असा प्रश्न तरुणांसमोर पडला आहे. महिलांवरील अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. मजुरांचे प्रश्न रखडलेले आहेत. समाजातील या प्रश्नांकडे श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना लक्ष वेधले. शेतकरी, मजूर, महिला, बेरोजगार युवक यांचे प्रतिनिधी यावेळी हजर होते. त्यांनी श्री. धिरज विलासराव देशमुख यांना विजयासाठी या वेळी शुभेच्छाही दिल्या.
अर्ज भरण्यापूर्वी बाभळगाव येथील श्री महादेव मंदिर, आई जगदंबा मंदिर, श्री मारूती मंदिर, धनेगाव येथील श्री रोकडेश्वर व लातूर येथील श्री साईबाबा मंदिरात जावून श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी मनोभावे दर्शन घेवून आशीर्वाद घेतले. तसेच, बाभळगाव येथील विलासबाग येथे माजी मुख्यमंत्री, लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या स्मृतिस्थळी पुष्प अर्पण करून दर्शन घेतले.
