भाजपचे माजी खासदार सुधाकर शृंगारेचा काँग्रेसमध्ये प्रवेश ;भर सभेत अमित देशमुख यांचा भाजपला हाय व्होल्टेज झटका
लातूर/ प्रतिनिधी-
भाजपचे माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी मंगळवारी हजारो लोकांच्या
उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी मंत्री आमदार अमित विलासराव
देशमुख यांच्या प्रचार शुभारंभांच्या सभेतच सुधाकर शृंगारे यांनी भाजपला मोठा
धक्का दिला आहे. भाजपमध्ये माझा आवाज दाबला जात होता. मला नुकताच
झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठीही फिरु दिले गेले नाही, असा गंभीर
आरोप माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी केला.

लातूर शहरचे आमदार अमित विलासराव देशमुख आणि लातूर ग्रामीणचे आमदार
धिरज विलासराव देशमुख यांच्या प्रचार सभेचा शुभारंभ शहरातील डॉ.
बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे आयोजित करण्यात आला होता. या प्रचार सभेला
हजारो लोकांची उपस्थिती होती. यावेळी निवेदकांनी उपस्थितांना आश्चर्याचा धक्का
देणारी एक घोषणा केली. भाजपचे माजी खासदार सुधाकर शृंगारे हे काँग्रेसमध्ये
प्रवेश करत असल्याचे जाहीर करताच उपस्थितांनी टाळ्या व शिट्यांच्या गजरात
याचे स्वागत केले.
काँग्रेसमध्ये येताच शृंगारे म्हणाले, ‘हा माझा पुनर्जन्म’
आज माझा पुन्हा नव्याने जन्म झाला आहे. आज मी भाजपमधून काँग्रेसमध्ये आलो आहे. याचे सर्व श्रेय आमदार अमित देशमुखांना जाते. नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत माझा पराभव कसा झाला याची माहिती अमित देशमुख यांना आहे.भाजपचे काम मी प्रामाणिक पणे केले. सात-आठ वर्षे पक्ष लातूरमध्ये जिवंतठेवण्याचे काम मी केले. पण माझ्या प्रचाराच्या वेळी इथल्या स्थानिक नेत्यांनी मला साथ दिली नाही. कोणी आजारपणाचे सोंग केले, कोणी मला मतदारसंघात फिरु दिले नाही, मला कुठे जाऊ दिले गेले नाही.
इथल्या प्रत्येक नेत्याने माझ्याविरोधात षडयंत्र केले. मला बाहेर पडू दिले नाही.
पण आता यातल्या एकालाही सोडायचे नाही. महाविकास आघाडीचे सहाच्या सहा
उमेदवार आपल्याला निवडून आणायचे आहेत, असे म्हणत अमित देशमुख आणि
धिरज देशमुख यांना प्रचंड बहुमताने निवडून आणायचं हेच एकमेव माझं मिशन
आहे आणि त्यासाठीच मी काँग्रेसमध्ये आलोय, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.
आमदार अमित देशमुख यांनी सुधाकर शृंगारे यांना काँग्रेस पक्षात योग्य तो मान
दिला जाईल तसेच त्यांचे योग्य ते पुनर्वसन केले जाईल, असा शब्द दिला. सुधाकर
शृंगारे यांनी हजारो लोकांच्या उपस्थितीत केलेला काँग्रेस प्रवेश भाजपसाठी
धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे. शृंगारे हे पहिल्यांदा २०१९ मध्ये
भाजपकडून लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. २०२४ मध्ये
भाजपने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली होती. परंतु, काँग्रेसचे डॉ. शिवाजी काळगे
यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता.