• Mon. Apr 28th, 2025

लातुरात महाविकास आघाडीचे जोरदार शक्तीप्रदर्शन माजी मंत्री आमदार अमित देशमुख, आमदार धिरज देशमुख यांचे उमेदवारी अर्ज दाखल

Byjantaadmin

Oct 29, 2024

माजी मंत्री अमित देशमुख यांनी कार्यकर्त्यांना दिला मंत्र; प्रचार सभेला मोठा
प्रतिसाद, माजी खासदार सुधाकर शृंगारे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

लातूर/प्रतिनिधी-
आदरणीय विलासराव देशमुख यांच्या दूरदृष्टीकोनामुळे आज लातूरची चौफेर
प्रगती झाली आहे. लातूर जिल्हा सुजलाम सुफलाम झाला आहे. मागील पाच
वर्षांत आम्ही लातूर शहरासाठी २४०० कोटींच्या योजना आणल्या आहेत.
कोणी टीका केली म्हणून आम्ही थांबणार नाही. जे मुद्दे नाहीत ते मुद्दे करण्याचे
प्रयत्न विरोधकांकडून होत आहेत. त्यापासून लातूरकरांनी सावध राहिले पाहिजे.
विरोधकांची चर्चा करु नका, कारण ते चर्चेतच नाहीत. आपण आपले काम
करायचे. ही आपली लढाई आहे, आपण आता कामाला लागू या, असा मंत्र माजी
वैद्यकीय शिक्षण मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी कार्यकर्त्यांना
दिला.

लातूर शहर आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या प्रचार शुभारंभ
सभेत ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री सहकार
महर्षी दिलीपरावजी देशमुख, राज्यसभेचे काँग्रेसचे खासदार इमरान प्रतापगडी,
अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव कुणाल चौधरी, लातूर लोकसभा
मतदारसंघाचे खासदार डॉ. शिवाजी काळगे, धाराशिवचे खासदार ओमराजे
निंबाळकर, आमदार धिरज विलासराव देशमुख, माजी आमदार उल्हास पवार,
वैशालीताई देशमुख, सौ. अदिती अमित देशमुख, सौ. दिपशिखा देशमुख, कृषी
उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, रेणा सहकारी साखर
कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, विकास सहकारी साखर कारखान्याचे
व्हाईस चेअरमन रवी काळे, ट्वेंटीवन शुगर कारखान्याचे व्हाईस चेअरमन

विजय देशमुख, मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन
श्याम भोसले, माजी आमदार वैजनाथ शिंदे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी
बँकेचे व्हाईस चेअरमन अॅड. प्रमोद जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

तत्पूर्वी, आमदार अमित देशमुख यांनी सहकुटुंब गंजगोलाई येथे जगदंबा मातेची
महाआरती केली. त्यानंतर प्रदक्षिण घालून प्रचार रॅलीची सुरुवात केली. ही रॅली
वाजत गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आणि हलगीच्या निनादात प्रचार
सभेस्थळी मार्गस्थ झाली. यावेळी हजारो लोकांची उपस्थिती होती. यावेळी
कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. देशमुख कटुंबीय आणि काँग्रेस पक्षाचे
प्रमुख कार्यकर्ते एका खुल्या रथात उपस्थितांचे आभार मानत होते.
कार्यकर्त्यांच्या हातात काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे झेंडे
होते. त्याचबरोबर प्रत्येक जण आमदार अमित देशमुख आणि आमदार धिरज
देशमुख यांच्या नावाचा जयघोष करत होते.

यावेळी भाजपचे माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. काँग्रेसच्या विजयासाठी
आपण झटणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मातोश्री वैशालीताई
देशमुख, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, सौ. आदिती अमित देशमुख,
खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, आमदार धिरज देशमुख आणि सहकारी
यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकार यांच्या कार्यालयात उमेदवारी
अर्ज दाखल केला.

विरोधी पक्षाने काय दिवे लावले?

आदरणीय विलासराव साहेब, शिवाजीराव पाटील निलंगेकर, शिवराज पाटील
चाकूरकर साहेब यांनी लातूर घडवण्याचे काम केले. या लातूरला काँग्रेसने
घडवले आणि विरोधी पक्ष आम्हाला प्रश्न करतोय की काँग्रेसने काय केले.
लातूरला जिल्ह्याचा दर्जा तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांनी दिला आणि
ही मागणी केली होती त्यावेळचे आमदार विलासराव देशमुख साहेब यांनी केली
होती. त्यावेळी लातूरला बस स्थानकही नव्हते. पण आता इथे विमानतळ आहे.
लातूरचा चौफेर विकास झाला आहे. विरोधी पक्षाने काय दिवे लावले, असा
सवाल आमदार अमित देशमुख यांनी केला.

भाई, भाऊ आणि दादांनी महाराष्ट्राचे वाटोळे केले
राज्यात भ्रष्टाचार फोफावलेला आहे. बेकारी वाढली आहे. महाराष्ट्राचे उद्योग
गुजरातला चालले आहे. कायदा-सुव्यवस्था मोडकळीस आली आहे. आता
आमदार-खासदारांची खरेदी सुरु झाली आहे. आता तर पक्ष फोडण्याची परंपरा
सुरु झाली आहे. भाई, भाऊ आणि दादांनी आपल्या महाराष्ट्राचे वाटोळे केले
आहे, असा टोला आमदार अमित देशमुख यांनी महायुती सरकारला लगावला.
या अडचणीतून राज्याला बाहेर काढण्यासाठी लातूरकरांनी पुढाकार घेण्याची
गरज आहे. आज आपण महाराष्ट्र धर्म पाळण्यासाठी आलो आहोत.

…बहुत कठीण है अर्जुन बनना
आमदार अमित देशमुख हे सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या
नेतृत्त्वाखाली आम्ही लढत आहोत, त्यामुळे आम्हाला कोणाचीच भीती नाही असे
म्हटले. ‘जब कोई कृष्ण ना हो साथ, बहुत कठीण है अर्जुन बनना’, असेही त्यांनी
यावेळी म्हटले. दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूरचा विकास
करण्यास आम्ही कटीबद्ध असल्याचा शब्द आमदार देशमुख यांनी यावेळी दिला.

दरम्यान, आमदार अमित देशमुख यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ७०
फुटी पुतळा उभारण्याचे काम महाविकास आघाडी करणार असल्याचे सांगितले.

भाजपच्या मुळावर घाव घालण्याची वेळ
भाजपच्या फांद्या आपण लोकसभेत कापल्या आहेत. त्यांना ३३० वरुन आपण
खाली खेचले आहे. आता त्यांच्या मुळांवर घाव घालण्याची वेळ आली आहे,
अशा शब्दांत माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी भाजपचा
समाचार घेतला. हे सरकार कोणाचे आहे, हेच कळत नाही. राज्यात अराजकता
निर्माण झाली आहे. कायदा-सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी महाविकास
आघाडीचे सरकार परत आणावे लागणार आहे.

युवकांच्या हाताला रोजगार देण्यासाठी महाविकास आघाडीला किमान १८० चे
संख्याबळ मिळायला हवे आणि हे साध्य फक्त तुमच्यामुळेच शक्य होणार आहे.
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांना न्याय मिळेल,
कायदा-सुव्यवस्था सुरळित राहील हे सांगताना त्यांनी कार्यकर्त्यांना प्रत्येक
बुथवर काळजीपूर्वक काम करण्याचा सल्लाही दिला.
कोण काय म्हणाले….
खासदार डॉ. शिवाजी काळगे- महायुती सरकारच्या योजना फसव्या आहेत.
एकीकडून आपल्याला दिल्याचे नाटक करायचे आणि दुसरीकडून आपल्याला
लुटायचे काम हे सरकार करत आहे. यांना धडा शिकवायचा आहे.

खासदार इम्रान प्रतापगडी- अमित देशमुख यांच्या राजकीय चार्तुयामुळे भाजप
चारीमुंड्या चीत झाली आहे. तुमच्याकडे अमित शहा आहेत. आमच्याकडे पण
अमित देशमुख आहेत. ते आमचे चाणक्य आहेत.

आमदार धिरज देशमुख- हे जाहिरातबाज सरकार आहे. योजनांवर कमी आणि
त्यांच्या जाहिरातीवर हे सरकार पैसे खर्च करत आहे. आता आपल्याला
शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी लढायचे आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर- महायुती सरकारने ११००० च्या सोयाबीनचा
भाव ३२०० पर्यंत आणला आहे. मतदानापूर्वी शेतकऱ्यांना याचा विचार
करावा. या सरकारची फक्त ‘लाडकी खूर्ची’ योजना सुरु आहे.

अभय साळुंखे- काँग्रेस पक्ष गरीबांचा आहे. काँग्रेसनेच लोकशाही दिली आहे.
भविष्य ओळखा. अमित देशमुख हे महाराष्ट्राचे भविष्य आहेत. त्यांना मोठ्या
मताधिक्याने निवडून द्या.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष देशमुख, लातूर शहर-जिल्हा काँग्रेस
कमिटीचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष
श्रीशैल्य उटगे, माजी महापौर स्मिता खानापुरे, माजी महापौर विक्रांत
गोजमगुंडे, माजी महापौर दीपक सूळ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे
सरचिटणीस मोईज शेख, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील,
यशवंतराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लातूर शहर
जिल्हाध्यक्ष राजा मणियार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे
महानगराध्यक्ष सुनील बसपुरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महिला
जिल्हाध्यक्ष सुनीता चाळक, कम्युनिस्ट पक्षाचे अॅड. उदय गवारे, माजी जिल्हा
परिषद सदस्य सुरेश लहाने, माजी सभापती दिलीप गोटके, रेणापूर कृषी उत्पन्न
बाजार समितीचे सभापती उमाकांत खलंगरे, उपसभापती शेषराव हाके, जागृती
शुगर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन लक्ष्मण रावजी मोरे, राष्ट्रवादी
काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रेणापूर तालुका अध्यक्ष बालाजी कदम, लातूर
शहर जिल्हा काँग्रेस कमिटी संघटक सुंदर पाटील, महिला प्रदेश उपाध्यक्ष

विद्या पाटील, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, विलास सहकारी बँकेचे व्हाईस
चेअरमन समद पटेल, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक
अशोक गोविंदपुरकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed