ऊस पुरवठादारांना मोफत साखर वाटप ; डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखान्याचा उपक्रम
निलंगा/प्रतिनिधी: अंबुलगा येथील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना,लीज ओंकार साखर प्रायव्हेट लिमिटेड च्या वतीने ऊस उत्पादन शेतकरी व कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते मोफत साखर वाटप करण्यात आली.माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतू हा उपक्रम राबविण्यात आला.या कार्यक्रमास कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील,ज्येष्ठ कार्यकर्ते व्यंकटराव धुमाळ,भाजपाचे निलंगा तालुकाध्यक्ष कुमोद लोभे, शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष मंगेश पाटील ,देवणी तालुकाध्यक्ष काशिनाथ गरीबे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना आ.संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, अनेक अडचणींवर मात करत हा कारखाना सुरू करण्यात आलेला आहे. आता कारखाना सुरळीतपणे चालू आहे.या माध्यमातून माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्वप्नाची पूर्तता होत आहे. कारखान्याच्या वतीने लवकरच सहप्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. यात डिस्टिलरी, वीजनिर्मिती,खत निर्मिती, को-जनरेशन,सीएनजी आदींचा समावेश आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा दर देता येणार आहे.कारखाना यशस्वीपणे चालविण्यासाठी चेअरमन बाबुराव बोत्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली.त्यांचे आपणा सर्वांच्या वतीने मी आभार मानतो, असेही आ. निलंगेकर म्हणाले.
हा कारखाना सुरळीतपणे चालविण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखान्याने साखर कारखानदारीत स्पर्धा निर्माण केली आहे. राज्यात सर्वाधिक ऊस गाळप करणारा कारखाना म्हणून आपल्या कारखान्याची वाटचाल सुरू आहे.हा कारखाना लवकरच मराठवाड्यात व राज्यातही नावारूपाला येणार आहे.शेतकऱ्यांचे हित हीच संकल्पना समोर ठेवून आपण कारखाना चालवीत आहोत. कारखान्याकडून शेतकरी हितालाच प्राधान्य दिले जात आहे,असेही ते म्हणाले.यावेळी बोलताना चेअरमन बाबुराव बोत्रे म्हणाले की,माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून मोफत साखर वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यापुढे दरवर्षी हा उपक्रम राबविण्याचा कारखान्याचा मानस आहे. कारखान्याने गतवर्षी सव्वातीन लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक उसाचे गाळप केले होते. यावर्षी पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या उसाला अधिकाधिक दर देण्याची परंपराही कायम राखली जाणार आहे.यावर्षी कारखाना दररोज साडेचार हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करत आहे. लवकरच ५ हजार मेट्रिक टन क्षमतेने गाळप केले जाणार आहे. कारखान्याच्या वतीने वेळापत्रकाप्रमाणे सर्व शेतकऱ्यांचा ऊस नेला जाणार आहे.एकाही शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही अशी ग्वाही देतानाच शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याच्या आवाहन बोत्रे पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन जिल्हा उपाध्यक्ष शेषराव माळे यांनी केले. या कार्यक्रमास निलंगा तालुक्यातील व कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
हक्काची साखर- आ.निलंगेकर

यावेळी बोलताना आ. संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, आपण ऊस पुरवठादारांना साखर देत आहोत.जेंव्हा शेतकरी आपल्या शेतात भाजीची लागवड करतो तेंव्हा तो आपल्या जवळच्या व्यक्तींना घरची भाजी म्हणून ती देतो.त्याच पद्धतीने आपल्या कारखान्यात उत्पादित झालेली ही आपली साखर आहे.आपल्या शेतात पिकवलेल्या उसापासून तयार झालेली आपल्या हक्काची साखर आहे.म्हणूनच ती आपल्याला दिली जात असल्याचेही ते म्हणाले.