मतदारसंघातील ग्रामदैवतांचे दर्शन घेत आ.निलंगेकर यांच्याकडून प्रचाराचा शुभारंभ
निलंगा/प्रतिनिधी: निलंगा विधानसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार,माजीमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा मतदारसंघाअंतर्गत असणाऱ्या निलंगा,देवणी व शिरुर अनंतपाळ तालुक्यातील विविध गावच्या ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला.गुरुवारी (दि.२४)सकाळी आ. निलंगेकर यांनी तालुक्यातील माकणी थोर येथील जाज्वल्य दैवत,नवसाला पावणाऱ्या मारुतीरायाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.पक्षाने दिलेल्या संधीचा पुरेपूर वापर करून मतदारसंघातील प्रत्येक कुटुंब,नागरिक व मतदाराचा विकास करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.याप्रसंगी भाजपा निलंगा तालुकाध्यक्ष कुमोद लोभे, देवणी तालुकाध्यक्ष काशिनाथ गरिबे,शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष मंगेश पाटील यांच्यासह पक्ष पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
तालुक्यातील राजेवाडी येथील नवसाचा शनिदेव, औराद शहाजानी येथील बालाजी मंदिर,मारुती मंदिर आणि अंबुलगा येथील मारुती मंदिरात जात आ.निलंगेकर यांनी दर्शन घेत आशीर्वाद घेतले. दरेवाडी येथील बालाजी मंदिर, लासोना येथील सद्गुरु शेषेनाथ महाराज (दत्त) देवस्थान, देवणी येथील महातपस्वी शिवयोगी गुरलिंगेश्वर संजीवनी समाधी विरक्त मठ या पवित्र स्थळांना त्यांनी भेटी दिल्या.
विरक्त मठातील सिद्धलिंगेश्वर स्वामी महाराजांचे दर्शन व आशीर्वाद घेतले. जनकल्याणाचा घेतलेला वसा कायम ठेवण्यासाठी ऊर्जा व शक्ती देण्याची प्रार्थना त्यांनी केली. औराद शहाजानी येथील महेबूब सुफानी दर्गा येथे दर्शन घेत मतदारसंघातील विकास प्रक्रिया निरंतर गतिमान ठेवण्याची प्रार्थना केली.मिळालेल्या संधीचा वापर लोककल्याणासाठी व्हावा यासाठी त्यांनी ऊर्जा मागितली.कानेगाव येथील गुरुमाऊली मंदिर येथे दर्शन घेऊन साकोळ येथील महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यास आ.निलंगेकर यांनी अभिवादन केले.शिरूर अनंतपाळ येथील मल्लिकार्जुन जगदंबा मंदिर,ग्रामदैवत अनंतपाळ मंदिर,हिप्पळगाव येथील ओंकार शंभू महादेव मंदिर येथेही आ. निलंगेकर यांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. याप्रसंगी मतदारसंघातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
