गरोदर व स्तनदा मातांच्या मदतीसाठी जिल्हा परिषदेत ‘जीवनरेखा’ कक्षाची स्थापना
•जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते उद्घाटन
लातूर, दि. 16 (जिकामा) : जिल्ह्यातील गरोदर व स्तनदा मातांच्या मदतीसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत ‘जीवनरेखा’ कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या उपस्थितीत या कक्षाचे आज उद्घाटन झाले. संस्थात्मक प्रसूती वाढविणे, अतिजोखमीच्या गरोदर महिलांना वेळेत मदत मिळवून देणे, माता मृत्यू कमी करणे, लिंगगुणोत्तर वाढविणे, शासकीय आरोग्य यंत्रणेत समन्वय राखण्याचे काम या कक्षाच्या माध्यमातून होणार आहे.
गरोदर महिलांना शासकीय यंत्रणेकडून आवश्यक सेवा, सुविधा योग्यप्रकारे मिळण्यासाठी जीवनरेखा कक्षामार्फत समन्वय ठेवला जावा. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय गरोदर महिलांची यादी तयार करून त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती संकलित करावी. जिल्ह्यात संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यासाठी गरोदर महिल्यांचे समुपदेशन या कक्षाद्वारे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी दिल्या.
अतिजोखमीच्या गरोदर महिलांना आवश्यक आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी नजीकचे ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच रुग्णवाहिक यांच्याशी योग्य समन्वय ठेवण्याचे काम जीवनरेखा कक्षामार्फत करावे. तसेच आशा सेविकांमार्फत गरोदर महिलांना, स्तनदा मातांना वेळोवेळी सेवा मिळत असल्याची खात्री करावी, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी यावेळी सांगितले.
अतिजोखमीचे आजार असलेल्या गरोदर महिला, त्या-त्या महिन्यात संभाव्य प्रसूती असलेल्या महिलांना जीवनरेखा कक्षातून दूरध्वनीद्वारे संपर्क साधला जाणार आहे. या मातांना आशा कर्मचारी, आरोग्यसेविक यांच्यामार्फत शासकीय सेवा, सुविधांचा लाभ मिळत असल्याची खात्री करण्यासोबतच त्यांच्या प्रसूतीसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच प्रसूतीसाठी शासकीय आरोग्य संस्थांमध्ये दाखल होण्याबाबत प्रोत्साहित करण्यासोबतच त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात येतील. अतिजोखमीच्या गरोदर महिलांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात योग्य समन्वय ठेवण्यासाठी या कक्षामार्फत प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी यावेळी दिली.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दाताळ, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. बरूरे, जिल्हा जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतीष हरिदास, कृषि अधिकारी श्री. चोले यावेळी उपस्थित होते.