• Wed. Apr 30th, 2025

लातूर जिल्ह्यातील 98 आरोग्य संस्थांना ‘कायाकल्प’ पुरस्कार

Byjantaadmin

Dec 16, 2022

लातूर जिल्ह्यातील 98 आरोग्य संस्थांना ‘कायाकल्प’ पुरस्कार

• महिला रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालये, सहा ग्रामीण रुग्णालयांना प्रोत्साहनपर पुरस्कार
• हरंडगुळी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अवलकोंडा आरोग्यवर्धिनी केंद्र जिल्ह्यात प्रथम

लातूर, दि. 16 (जिमाका) : आरोग्य संस्थांमधील सेवांची गुणवत्ता वाढविण्यासाठी केंद्र शासनाने सुरु केलेल्या ‘कायाकल्प’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 98 आरोग्य संस्थांना सन 2021-22 या वर्षातील कामगिरीबद्दल ‘कायाकल्प पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या संस्थांच्या पुरस्काराची एकत्रित रक्कम सुमारे 42 लक्ष रुपये आहे.

राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कारामध्ये लातूर येथील स्त्री रुग्णालयाला तीन लक्ष रुपयांचा प्रोत्साहनपर पुरस्कार जाहीर झाला आहे. उदगीर आणि निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालय, तसेच किल्लारी, अहमदपूर, रेणापूर, चाकूर, बाभळगाव आणि मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयाला प्रत्येकी एक लक्ष रुपयांचा प्रोत्साहनपर पुरस्कार जाहीर झाला आहे.

उदगीर तालुक्यातील हरंडगुळी प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रथम क्रमांकाचा जिल्हास्तरीय कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्काराची रक्कम दोन लक्ष रुपये आहे. तसेच अवलकोंडा येथील आरोग्यवर्धिनी केंद्राला एक लक्ष रुपयांचा जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांकाचा, एकुर्गा आरोग्यवर्धिनीला 50 हजार रुपयांचा द्वितीय पुरस्कार आणि किनी यल्लादेवी आरोग्यवर्धिनी केंद्राला 35 हजार रुपयांचा तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील 24 प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचा जिल्हास्तरीय प्रोत्साहनपर पुरस्कार आणि 61 आरोग्यवर्धिनी केंद्रांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचा प्रोत्साहनपर पुरस्कार जाहीर झाला आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी, डॉ. एस. एल. हरिदास, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी ए. सी. पंडगे व जिल्हा गुणवत्ता नियमन समन्वयक डॉ. पल्लवी रेड्डी यांनी कायाकल्प अभियानाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.

*संस्था निवडीचे हे आहेत निकष*

रुग्णालयातील स्वच्छता व टापटीप, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन, संसर्ग नियंत्रणासाठी केलेले प्रयत्न, इतर समर्थन सेवा, स्वच्छता प्रचार व प्रशिक्षण सेवा आदी विविध निकषांच्या आधारे कायाकल्प पुरस्कारासाठी आरोग्य संस्थांची निवड केली जाते. या निकषांनुसार संबंधित संस्थेचे कर्मचारी प्राथमिक स्तरावर गुणांकन करतात. त्यानंतर जिल्हा व राज्यस्तरीय पथकाकडून आरोग्य संस्थेचे तपासणी होवून 70 टक्केपेक्षा अधिक गुणप्राप्त करणाऱ्या संस्थांना पुरस्कार दिला जातो.

*जिल्हास्तरीय प्रोत्साहनपर पुरस्कारप्राप्त 24 प्राथमिक आरोग्य केंद्र*

अहमदपूर तालुक्यातील हाडोळती, शिरूर ताजबंद, सताळा, किनगाव, अंधोरी, उदगीर तालुक्यातील देवर्जन, हेर, वाढवणा बु., औसा तालुक्यातील लामजना, जवळगा पो., भादा, उजनी, मातोळा, जळकोट तालुक्यातील वांजरवाडा, अतनूर, निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा, निटूर, रेणापूर तालुक्यातील खरोळा, लातूर तालुक्यातील भातांगळी, चिकुर्डा, तांदूळजा, निवळी, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हास्तरीय प्रोत्साहनपर पुरस्कार जाहीर झाला आहे.

*जिल्हास्तरीय प्रोत्साहनपर पुरस्कारप्राप्त 61 आरोग्यवर्धिनी केंद्र*

अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव, कुमठा बु., डोंगर शेळकी, वळसंगी, काजळा हिप्परगा, मांडणी, उजना, शिंदगी बु., रुध्दा, उदगीर तालुक्यातील करडखेल, बनशेळकी, गुडसूर, वाढवणा खु., दावणगाव, तोंडार, बामणी, मोघा, औसा तालुक्यातील लोदगा, तळणी, सारोळा, आशिव, चाकूर तालुक्यातील घरणी, उजळंबा, जढाळा, झरी खु., बोथी, जळकोट तालुक्यातील गव्हाण, जगळपूर, कोळनूर, घोणशी, गुत्ती, तिरूका, चेरा, कुणकी, माळहिप्परगा, देवणी तालुक्यातील सावरगाव, निलंगा तालुक्यातील अनसरवाडा, सावरी, भूतमुगळी, रेणापूर तालुक्यातील तळणी, लातूर तालुक्यातील खंडापूर, खोपेगाव, हरंगूळ खु., काटगाव, बोरगाव काळे, गाधवड, सोनवती, हरंगूळ बु., भोईसमुद्रा, कव्हा, वांजरखेडा, मुरुड अकोला, माटेफळ, गातेगाव, एकुर्गा, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील राणी आंकूलगा, तळेगाव बोरी, धामणगाव, हिप्पळगाव, उजेड, शिवपूर या आरोग्यवर्धिनी केंद्रांना प्रोत्साहनपर पुरस्कार प्राप्त झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *