काँग्रेसह इतर प्रादेशिक पक्षांवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भारतीय जनता पार्टीनंही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देताना रक्ताच्या नात्यांना महत्त्व दिलं आहे. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या 99 उमेदवारांची यादी पक्षानं रविवारी (20 ऑक्टोबर) यादी जाहीर केली. या यादीमध्ये राजधानी मुंबईतील मालाड वेस्टपासून ते मराठवाड्यातील भोकर मतदारसंघापर्यंतच्या वेगवेगळ्या भागात भाजपानं दिग्गज नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ‘पार्टी विथ डिफरन्स’ असा दावा करणारी भाजपा देखील ‘पार्टी विथ नातीगोती’ बनला आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कोणत्या नातेवाईंकांना मिळाली उमेदवारी?
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना तातडीनं राज्यसभा खासदार करण्यात आलं. चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशाचा लोकसभा निवडणुकीत तरी भाजपाला फायदा झालेला दिसला नाही. परंपरागत नांदेडसह संपूर्ण मराठवाड्यातून भाजपाचा एकही खासदार निवडून आला नाही. लोकसभेतील अपयशानंतरही भाजपानं चव्हाण यांच्यावर विश्वास ठेवला आहे.
अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाणला भाजपानं नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. भोकर हा चव्हाण कुटुंबीयांचा परंपरागत मतदारसंघ आहे. या उमेदवारीनं श्रीजया यांनी निवडणुकीच्या राजकारणात पदार्पण केलं आहे.मुंबई भाजपा अध्यक्ष आणि वांद्रे पश्चिमचे आमदार आशिष शेलार यांच्याही घरातील आणखी एका व्यक्तीला पक्षानं तिकीट दिलंय. शेलार यांचे भाऊ आशिष शेलार मालाड पश्चिम मतदारसंघातून यंदा निवडणूक लढवणार आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप असलेले भाजपा आमदार गणपत गायकवाड यांचं तिकीट पक्षानं कापलंय. पण, गायकवाड यांच्या कल्याण पूर्व मतदारसंघातून पक्षानं त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे.चिंचवड मतदारसंघातून भाजपानं विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांच्या जागी त्यांचे दीर शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ते चिंचवडचे दिवगंत आमदार लक्ष्मण जगताप यांचे भाऊ आहेत. जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघातून भाजपानं घराणेशाहीची परंपरा पाळलीय. या मतदारसंघातून दिवंगत आमदार हरीभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे यांना उमेदवारी दिली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिल्यानं जावळे नाराज होते, अशी चर्चा होती. आहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघातून भाजपानं विद्यमान आमदार बबनराव पाचपुतेंच्या पत्नी प्रतिभा पाचपुतेंना उमेदवारी दिली आहे.
