• Tue. Apr 29th, 2025

मोठी बातमी! महाविकास आघाडीला तडे, ठाकरे-फडणवीसांची गुप्त भेट, काँग्रेस सूत्रांचा खळबळजनक आरोप

Byjantaadmin

Oct 21, 2024

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. कारण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचा दावा काँग्रेसमधील सूत्रांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु असल्याचे दिसत असतानाच मविआला भेगा पडताना दिसत आहेत. याआधीही वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याने ठाकरे-फडणवीस यांची मातोश्रीवर भेट झाल्याचा दावा केला होता.राऊत-शाह, ठाकरे-फडणवीस भेटीची चर्चा

उद्धव ठाकरे स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा त्यांच्या भेटीनंतर आल्याचं काँग्रेसमधील सूत्रांचं म्हणणं आहे. ठाकरेंच्या आक्रमक बाण्याने काँग्रेसनेही स्वबळावर लढण्याची तयारी केल्याचं चित्र आहे. संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचं काँग्रेसमधील सूत्रांचं म्हणणं आहे. तर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचा दावा केला जात आहे. भाजप ठाकरेंबाबत ‘बिहार पॅटर्न’ राबवण्याची भीती काँग्रेसला सतावत आहे. ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीने यासंदर्भात बातमी दिली आहे.जागावाटपावरुन रस्सीखेच

काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये जागावाटपावरुन तिढा असल्याचं वारंवार पाहायला मिळत आहे. आधी संजय राऊत यांनी नाना पटोलेंसोबत चर्चेत सहभागी न होण्याचा पवित्रा घेतला होता. तर महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषद नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्याविषयी जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे मविआमध्ये तडे जाताना दिसले होते. नंतर राऊतांनी नरमाईची भूमिका घेतली असली, तरी फूटीची नांदी झाल्याची चर्चा होती.

ठाकरेसेना मविआतून बाहेर पडणार?

विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख अवघ्या एका दिवसावर आली आहे. मात्र अद्याप महाविकास आघाडी किंवा महायुती यांनी जागावाटप जाहीर केलेले नाही. भाजप वगळता एकाही पक्षाने उमेदवार यादी जाहीर केलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात कुजबूज सुरु आहे. त्यानुसार ठाकरे गट २८८ जागांवर उमेदवार उभे करुन स्वबळावर निवडणुकांना सामोरे जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र काँग्रेसनेही स्वबळाची भाषा करताच ठाकरेसेना काहीशी नरमल्याचं बोललं जातं. कारण मविआतून ठाकरे बाहेर पडल्यास सहानुभूती काँग्रेस आणि पवार गटाला जाण्याची भीती त्यांना सतावत आहे. त्यामुळे विधानसभेला नेमकं काय होणार, याची उत्सुकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed