माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उमेदवारीचे मतदारसंघात स्वागत फटाक्यांच्या आतिषबाजी तर पेढ्यांचे वाटप
निलंगा दि. २० (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाने आज विधानसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिल्याचे निश्चित झाले आहे. आ. निलंगेकर यांच्या उमेदवारीचे मतदारसंघात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत करण्यात आलेले असून विविध ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी व पेढे -मिठाईचे वाटप करण्यात आले.
निलंगा विधानसभा मतदारसंघात यापूर्वी तीनदा भाजपच्या वतीने निवडून आलेले आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी राज्य सरकारमध्ये मंत्रीपदासह जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचीही जबाबदारी सांभाळली होती. मतदारसंघासह जिल्ह्याच्या विकासासाठी आ. निलंगेकर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजनांद्वारे कोट्यवधींचा निधी खेचून आणलेला आहे. या माध्यमातून विकासाचा नवा पॅटर्नच आ. निलंगेकर यांनी उदयास आणलेला आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारांची यादी कधी बाहेर येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. भारतीय जनता पक्षाने आज ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यामुळे निलंगा मतदारसंघातूनभाजपाकडून तेच निवडणूक लढवणार यावर शिक्कामोर्तब झालेला आहे.
आ. निलंगेकर यांची उमेदवारी जाहीर होताच मतदारसंघातील निलंगा, देवणी व शिरुर अनंतपाळ तालुक्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने जल्लोष करून त्यांच्या उमेदवारीचे स्वागत केले आहे. विधानसभा प्रभारी दगडू साळुंके, निलंगा तालुकाध्यक्ष कुमोद लोभे, निलंगा शहराध्यक्ष अॅड. विरभद्र स्वामी, देवणी तालुकाध्यक्ष काशिनाथ गरीबे व शिरुर अनंतपाळ तालुकाध्यक्ष मंगेश पाटील यांच्या नेतृत्वात या तिन्ही तालुक्यांसह निलंगा शहरात फटाक्यांची आतिषबाजी करून पेढे वाटण्यात आले. यामध्ये भाजपा महायुतीचे आजी – माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख यांच्यासह कार्यकर्त्यांचाही समावेश होता. पक्षश्रेष्ठींनी आ. निलंगेकर यांच्या जो विश्वास दर्शविला आहे. तो सार्थ ठरवत मराठवाड्यातच नव्हे तर राज्यभरात आ. निलंगेकर यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्याचा मानस यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
