मुंबई: विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता सर्वांची नजर कोणाला उमेदवारी मिळते याकडे लागले आहे. २०१९च्या तुलनेत ही निवडणूक अधिक चुरशीची ठरणार आहे. महाविकास आघाडीमधील ३ पक्ष आणि महायुतीमधील ३ पक्ष अशा सहा पक्षांतून उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वांना आहे. अशात सत्ताधारी गटातील भाजपची पहिली यादी उद्या म्हणजे १८ ऑक्टोबरला जाहीर होण्याची शक्यता आहे.
भाजपची पहिली यादी १०० जणांची असू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षाकडून या संभाव्य उमेदवारांना कागदपत्रे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. महायुती कोणी किती जागा लढवायच्या याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिघात सर्वाधिक जागा भाजप लढवणार हे निश्चित आहे. भाजप १२६ जागांवर लढण्याची शक्यता असून यातील पहिल्या १०० उमेदवारांची यादी उद्या जाहीर केली जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटाला ९० तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला ७२ जागा मिळण्याची शक्यता आहे.
भाजपच्या पहिल्या यादीत राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, रविंद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, नितेश राणे, संजय कुटे, संभाजी पाटील निलंगेकर, आशिष शेलारसह इतर नेत्यांचा समावेश असेल. पहिल्या यादीतील नावे ही अशा मतदारसंघातील असतील ज्यांची निवडणून येण्याची खात्री १०० टक्के आहे आणि जे मतदारसंघ सुरक्षित आहेत.
निवडणूक आयोगाकडून विधानसभेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर दिल्लीत महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेचा वेग वाढला होता. दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा, पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा, संघटन महामंत्री बी.एल संतोष, राज्याचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विन वैष्णव यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने १६४ जागा लढवत १०६ जागांवर विजय मिळवला होता. यामुळेच या निवडणुकीत देखील भाजपच मोठा भाऊ असणार हे निश्चित आहे.