• Tue. Apr 29th, 2025

निवडणूक पत्रक, भित्तीपत्रिका छपाई करणाऱ्या मुद्रणालय चालकांनी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आवाहन

Byjantaadmin

Oct 18, 2024

निवडणूक पत्रक, भित्तीपत्रिका छपाई करणाऱ्या मुद्रणालय चालकांनी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आवाहन

लातूर, दि. 18 :  भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम 15 ऑक्टोबर, 2024 रोजी घोषित केला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 127 अ अन्वये निवडणूक पत्रकाच्या व भित्तीपत्रकाच्या छपाईबाबत निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याप्रमाणे हे छपाई कामे करणारे मुद्रणालय चालकांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी (उपचिटणीस शाखा) यांच्याकडे विहीत नमुन्यात प्रतिज्ञापत्र त्वरीत सादर करणे आवश्यक आहे.

तरी सर्व प्रेसधारकांनी याबाबतीत अधिक माहितीसाठी आणि प्रज्ञिापत्रासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालये येथे उपचिटणीस शाखेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे प्रतिज्ञापत्र करुन दिल्याशिवाय विधानसभा निवडणूक संदर्भातील उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी अथवा राजकीय पक्ष यांच्यासाठी छपाई करुन दिल्यास संबंधित प्रेसधारका विरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील तरतुदीनुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. याबाबतच्या सविस्तर सूचना कार्यालयीन वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय (उपचिटणीस शाखेत) उपलब्ध असतील , असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे .

 निवडणूक कालावधीत निवडणूक पत्रके, भिततीपत्रके इत्यादी मुद्रण व प्रकाशन या बाबींचे नियंत्रण लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 127 अ मधील तरतुदीद्वारे केले जाते. कोणतेही निवडणूक पत्रक, भित्तीपत्रक किंवा अशा इतर छापलेल्या साहितयावर, छापणाऱ्या व प्रसिध्द करणाऱ्या व्यक्तीची (मुद्रक व प्रकाशक) नावे व पत्ते पत्रकाच्या प्रिंट लाईनमध्ये स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे. मुद्रांकित केलेल्या साहित्याच्या अथवा वस्तूंच्या चार प्रती जिल्हादंडाधिकारी कार्यालयात छपाई केल्यानंतर तीन दिवसाच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. जोडपत्र (अ) मध्ये कलम 127 (अ) (2) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे असा मजकूर छापण्यात आल्यापासून तीन दिवसाच्या आत मुद्रकाने प्रकाशकाकडून मिळविलेले घोषणापत्र, जिल्हादंडाधिकारी कार्यालयात सादर करावे. घोषणापत्रावर प्रकाशकाची स्वाक्षरी नावानिशी घेण्यात यावी. तसेच भाग 02 मध्ये दोन साक्षीदार प्रकाशकास व्यक्तीश: ओळखणारे असावेत. जोडपत्र (ब) मध्ये मुद्रकाने मुद्रीत केलेल्या साहित्याचा संपूर्ण तपशील प्रकाशकाचे नाव व पत्ता, प्रतीची संख्या, छपाईचा खर्च, छपाईचा दिनांक इत्यादी सर्व माहिती भरुन स्वत:च्या नावासह स्वाक्षरी करुन सादर करावी.

या सूचनांचे तसेच लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 127 (अ) मधील तरतुदीचा भंग केल्यास त्याची गंभीर दखल घेण्यात येईल. तसेच संबंधितांविरुध्द कडक कार्यवाही (ज्यामध्ये मुद्रणालयाचा परवाना रद्द करण्याचा समावेश आहे) केली जाईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed