निलंगेकर परिवाराला आध्यात्मिक वारसा- हभप गुरुबाबा महाराज औसेकर
श्री विठ्ठल-रुक्मिणी प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा संपन्न
लातूर/प्रतिनिधी: निलंगेकर परिवाराकडे अध्यात्मिक अधिष्ठान आहे.या परिवाराला सामाजिक आणि राजकीय वारशासोबतच अध्यात्मिक वारसाही लाभला असून आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी तो जोपासला असल्याचे प्रतिपादन औसा येथील नाथपीठाचे गुरुवर्य हभप गुरुबाबा महाराज औसेकर यांनी केले.लातूर येथील वृंदावन कॉलनी परिसरात श्रीकृष्ण विहारमध्ये बांधण्यात आलेल्या मंदिरात श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यात गुरुबाबा महाराज बोलत होते.या कार्यक्रमास माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासह अधिराज बिल्डकॉनचे उदय पाटील, कमलाकर जाधव,श्रीकृष्ण विहार असोसिएशनचे शिवाजीराव चाफेकर,डॉ.पवन खिचडे व मान्यवर उपस्थित होते.निलंगा येथील माधवाचार्य पिंपळे महाराज यांच्या अधिपत्याखाली स्थापनेचे विधी संपन्न झाले.
यावेळी बोलताना गुरुबाबा महाराज म्हणाले की,आ.संभाजीराव पाटील हे घराण्याचा वारसा सांभाळत आहेत. त्यांचे आजोबा मुख्यमंत्री होते.वडील आमदार तर आई खासदार होत्या. धाकटे बंधू अरविंद पाटील हे देखील संभाजी पाटील यांच्याप्रमाणेच समाजकार्यात अग्रभागी असतात.या परिवाराने समाजसेवेचा विडा उचललेला आहे.त्याला अध्यात्माची जोड दिलेली आहे.राजकारण, समाजकारण व अध्यात्माचा त्रिवेणी संगम या परिवारात पाहायला मिळतो.संस्कृती जोपासण्याचे काम या परिवाराकडून केले जात असल्याचे गुरबाबा महाराज म्हणाले.यावेळी बोलताना आ. संभाजीराव पाटील म्हणाले की,आपल्या निलंग्यात गुणवंतांची खाण असून हे गुणवंत केवळ निलंग्यातच नव्हे तर देशात व देशाबाहेरही नावलौकिक करत आहेत. त्याच पद्धतीने निलंग्याचे मूळ रहिवासी असलेले आमच्या मित्र परिवारातील सदस्य उदय पाटील यांनी लातूर येथे बांधकाम क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.शहरात हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.या स्वप्नाची पूर्तता करताना ते योग्य रीतीने पूर्ण व्हावे व त्या स्वप्नात कोणताही मिठाचा खडा पडू नये अशी प्रामाणिक भावना ठेवून उदय पाटील यांनी बांधकाम क्षेत्रात पदार्पण केले.या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी केवळ ग्राहकच नव्हे तर एक परिवार तयार केला आहे. या माध्यमातून त्यांनी अल्पवधीतच गरुडझेप घेतली आहे.आगामी काळातही त्यांच्या यशाची उंची वाढत राहील असा मला विश्वास आहे. आपल्या व्यवसातून त्यांनी लातूर शहरच नव्हे तर जिल्ह्यातील नागरिकांचा विश्वास संपादन करून तो जोपासला आहे असे सांगत भावी वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी कमलकिशोर धूत,श्रीकृष्ण विहार कॉलनीचे अध्यक्ष बबन नाडे,सचिव दगडू पांचाळ, शिरीष उंडे,नितीन नटवे, गणेश भटकर,संतोष अट्टल,निलंग्याचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे,दत्तात्रय गोमारे, वास्तूविशारद गोपाळ शिंदे,बाबासाहेब कोरे, रवींद्र औसेकर,गोपाळ नादरगे,अमोल मुळे, विष्णू मदने आदींसह भाविकभक्त व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
