निवडणूक प्रक्रिया निःपक्षपाती, शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज -उपविभागीय अधिकारी शरद झाडके
• आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी विविध पथके तैनात
निलंगा, : निलंगा विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व निवडणूक प्रक्रिया निःपक्षपाती, भयमुक्त आणि शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी ज निवडणूक यंत्रणा सज्ज असून, सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक अधिकारी शरद झाडके यांनी येथे केले. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, नायब तहसीलदार कुलदीप देशमुख उपस्थित होते.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी निलंगा विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. मतदारसंघात 3 लाख 30 हजार 935 मतदार यावेळी आपला हक्क बजाविणार आहेत. यामध्ये १८ ते १९ वर्षे वयोगटातील जवळपास 7 हजार 637 मतदार आहेत. तसेच ८५ वर्षांवरील 6 हजार 221आणि दिव्यांग 2 हजार 850 मतदार आहेत. यावेळी 2 नवीन मतदान केंद्रांची वाढ झाली असून एकूण 347 मतदान केंद्रांवर मतदान होणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी झाडके यांनी दिली. तसेच गतवेळी कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रांवरील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ अंतर्गत मतदार जागृतीचे विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी विविध पथके

आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी स्थिर निगराणी पथके, भरारी पथके तैनात करण्यात आली असून क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. पेड न्यूज, फेक न्यूज, सोशल मिडीयावर लक्ष ठेवले जाणार आहे. सी-व्हीजील ऍपच्या माध्यमातून नागरिकांना आदर्श आचारसंहिता भंगाची तक्रार करता येणार आहे. यासोबतच नागरिकांसाठी १९५० हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था, आदर्श आचारसंहिता, मनुष्यबळ व्यवस्थापन, निवडणूक खर्च संनियंत्रण यासारखी पथके कार्यरत करण्यात आली असल्याचे उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांनी सांगितले.