कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन, पदोन्नतीसाठी आझाद मैदान, मुंबई येथे ‘कास्ट्राईब’चे धरणे आंदोलन
· महासंघाच्या नागपुरातील अधिवेशनात राज्यातील 29 प्रमुख संघटनातील कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.
· अधिवेशनात विविध ठराव संमत.
· विशेष कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा केला गौरव.
लातूर, : कास्ट्राईब कर्मचारी संघटना ही शासनसोबत विविध प्रलंबित प्रश्नावर चर्चा करुन मागासवर्गीय बहुजन कर्मचा-यांना न्याय देण्याचे काम करते. या संघटनेचे प्रस्तावित ध्येय व धोरणे साध्य करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.
महासंघाचे 44 वे अधिवेशन डॉ.बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्वेशन सेंटर, नागपूर येथे (दि.11 रोजी) तेथील सभागृहात पार पडले. अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याहस्ते झाले. त्यावेळी श्री.आठवले यांनी दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा इंगळे हे होते तर नागपूर भूमिअभिलेख उपसंचालक विष्णु शिंदे, रिपाईचे ज्येष्ठ नेते भुपेश भूलकर, अॅड. प्रदीप वठारे अधिवक्ता मा. उच्य न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व अॅड. प्रदीप दंडवते अधीवक्ता मा. उच्य न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर, महासंघाचे सरचिटणीस उत्तम सालवणकर,कार्याध्यक्ष गणेश मडावी, वरिष्ठ उपाध्यक्ष सुमित भुईगळ, मनोज कांबळे, लातूर जिल्हाध्यक्ष नितीन बनसोडे, सरचिटणीस अशोक माळगे, संघटक नागरत्न कांबळे यांच्यासह महाराष्ट्रातील महासंघाचे विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या हितासाठी शासनाकडे शांततेच्या मार्गाने मोर्चो, आंदोलन, उपोषण करुन चर्चा करण्यासाठी शासनास भाग पाडून सर्व सामान्य कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणारे महाराष्ट्रातील श्री. इंगळे हे एकमेव चळवळीतील नेते आहेत. यावेळी त्यांनी त्यांच्या विविध कार्याचा गौरव केला. कास्ट्राईब संघटना ही महाराष्ट्रभर कार्यरत असून कर्मचाऱ्यांच्या भरती पदोन्नती व सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी वाहून घेतले आहे. केंद्र व राज्य सरकारकडे कर्मचाऱ्यांच्या हिताचे प्रस्ताव दाखल केल्यास तातडीने प्रशन मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात श्री.इंगळे म्हणाले की, संघटनेच्या माध्यमातून मागासर्गीयांच्या भरती व पदोन्नतीतील आरक्षणासाठी विविध ठिकाणी धरणे आंदोलन केले आहेत. आता आजाद मैदान, मुंबई येथे महाराष्ट्रातील सर्व संघटनांच्या वतीने कास्ट्राईबचे लवकरच आंदोलन करण्यात येणार आहे. मागासवर्गीय कर्मचा-यांच्या अन्यायाविरुध्द लढा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संघटना आहे. ही संघटना 55 वर्षापासून कार्यरत आहे. एस.टी. कर्मचारी, सामाजिक न्याय विभागातील प्रश्न, शिक्षण विभाग, विशेष भरती सुरु करणे, बदल्या, शिष्यवर्ती मर्यादा वाढविणे, पदोन्नती व भरती, विद्यापीठे व कृषि विभाग, पोलीस अदि विविध खात्यातील असंख्य केसेस सोडवून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला. शासनाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेल्या ४१ ठिकाणच्या संवर्धनासाठी सुमारे ३९ कोटी रूपये निधी उपलब्ध करून दिला. याचा मला आनंद आहे. तसेच संघटनेच्या वतीने दरवर्षी एक याप्रमाणे 43 मागासवर्गीय गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले. माझा एकच नारा आहे की, भविष्यातील अडचणीवर मात करण्यासाठी बचत करा, व्यसन सोडा आणि शिक्षण घ्या.
यावेळी कार्याध्यक्ष गणेश मडावी म्हणाले की, शासनाने किरकोळ पत्र काढून मागावर्गीयांची पदोनन्ती बंद केली.हा अन्याय सहन केला जाणार नाही. एस.टी./एस.सी. यांचे उपवर्गीकरण व क्रिमिलेअरबाबत दिलेला निकाल व आरक्षणावर होणारा अ,ब,क, ड चा परिणाम लक्षात घेता उच्च न्यायालयात दाद मागणार असून यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. याच विषयावर सतिष कांबळे, उत्तम सालवणकर यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रस्ताविक महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुमित भुईगळ यांनी केले. सूत्रसंचालन विभूतीचंद्र गजभिये तर परसराम गोंडाणे आभार यांनी मानले. अधिवेशनास राज्यातील विविध जिल्ह्यातील 29 प्रमुख संघटनांचे पदाधिकारी सहभागी होते.
अधिवेशानातील संमत ठराव
मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची पदोन्नती, रिक्त पदे भरणे, एस.टी./एस.सी. यांचे उपवर्गीकरण व क्रिमिलेअरबाबत दिलेला निकालाविरुध्द उच्च न्यायालयात जाणार, जुनी पेन्शन योजना लागू करा. शासकीय कंत्राटी भरती, शाळांचे खासगीकरण करू नये. सर्व विभागांमध्ये नवीन पदभरती, पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करा. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पदोन्नती करा. विविध विभागातील रिक्त पदे प्राधान्याने भरा, आदी ठराव अधिवेशनात एकमताने संमत करण्यात आले.
‘ विशेष कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा चा गौरव ’
श्री. किशोर रामटेके यांचा विशेष सत्कारमूर्ती म्हणून तर विशेष कार्य करणाऱ्या विभूतिचंद्र गजभिये, उत्तम सालवनकर, आर. एम.कांबळे, लक्ष्मण वानखेडे, सतीश कांबळे, चंदन चावरिया, प्रभाकर सोंनडवले, डॉ. सुभाष गायकवाड, सुभाष डोंगरदेवे कर्मचारी यांचा कृष्णा इंगळे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, शाल व गुलदस्ता देऊन सत्कार करुन गौरविण्यात आले.
