• Wed. Apr 30th, 2025

 महाराष्ट्रातील तमाम जनतेने महामोर्चात सहभागी व्हावे – अजित पवार

Byjantaadmin

Dec 16, 2022

महाराष्ट्रातील तमाम जनतेने महामोर्चात सहभागी व्हावे – अजित पवार

 

 

मुंबई दि. १६ डिसेंबर – सतत महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य आणि गरळ ओकण्याचे काम थांबायला तयार नाही त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून हा मोर्चा राजकीय पक्षाशी निगडित नसल्याने या महामोर्चाला राज्यातील सर्व जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केले.
काल महामोर्चाच्या आढाव्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी देवगिरी येथे पार पडली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

महापुरुषांचा सतत केला जाणारा अपमान, सीमा प्रश्न व महागाई, बेरोजगारी हे सर्व प्रश्न घेऊन सत्ताधारी लोकांचा धिक्कार करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि जनताही मोठ्याप्रमाणावर सहभागी होणार आहेत. ज्यांचा पक्षाशी संबंध नाही परंतु स्वाभिमान दुखावला गेला आहे असेही लोकं सहभागी होतील असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

अत्यंत समंजस भूमिका सर्व पक्षांनी घेतली आहे. अनेक राजकीय पक्ष त्यात सहभागी झाले आहेत. ज्या – ज्या वेळी बैठका घेण्यात आल्या त्या – त्या वेळी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी हजर होते. आजच्या बैठकीत मोर्चाचा आढावा घेण्यात आला. तिथे शिस्त राहिली पाहिजे. तिथे कुठेही काहीही विध्वंसक होणार नाही. अतिशय शांततेच्यामार्गाने
लोकशाहीत आपले मत प्रदर्शित करताना मोर्चा काढतो त्याचपध्दतीने हा मोर्चा काढणार आहोत असेही अजित पवार म्हणाले.
काल दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विनियोजन बिलासंदर्भात बैठक झाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत घेतलेल्या बैठकीबाबत काय ठरले,त्या बैठकीतून काय मार्ग निघाला याची विचारणा केली त्यावेळी त्यांनी दोन्ही राज्यांनी शांतता ठेवावी. महाराष्ट्रातून तीन मंत्री आणि कर्नाटकचे तीन मंत्री अशी सहा लोकप्रतिनिधींची समिती राहिल आणि अधिकार्‍यांची एक समिती राहणार आहे असे सांगितले.

कर्नाटकची बाजू सुप्रीम कोर्टात ॲड. रोहतगी मांडणार आहेत हे समजल्यावर आम्ही ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांना महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडावी अशी मागणी करणारे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात दिले व मुख्यमंत्री यांनाही पत्र दिले आहे. आपली बाजू सुप्रीम कोर्टात चांगल्या पद्धतीने मांडणे ज्यामुळे त्या भागात राहणाऱ्या मराठी भाषिक लोकांची आग्रही मागणी आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेची मागणी आहे. बेळगाव, कारवार, निपाणी हे आपल्यात आले पाहिजे अशा पध्दतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुचवले आहे. दोन्ही राज्यांनी समंजस भूमिका घ्यावी शिवाय विरोधी पक्षांनीही घ्यावी त्यात तिन्ही पक्षाचा उल्लेख अमित शहा यांनी केला. आम्ही पहिल्यापासून राजकारण करायचं नाही अशी आमची भूमिका राहिली आहे असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

यावेळी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ‘हीच वेळ आहे जागे होण्याची’ आणि या महामोर्चात सहभागी होण्याची अशी हाक तमाम महाराष्ट्र प्रेमींना दिली. शिवाय सीमावादावर जी बैठक झाली त्या बैठकीत नवीन काय घडले असा सवाल करतानाच हा वाद ट्वीटने १५ – २० दिवस चिघळत असताना खुलासा करायला इतका वेळ का लागला आणि हा खुलासा दिल्लीत बैठक होईपर्यंत का थांबला होता असा रोखठोक प्रश्न उपस्थित केला.
या बैठकीला माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान, मुंबई अध्यक्ष आमदार भाई जगताप, कॉंग्रेसचे नेते नसीम खान, शिवसेना आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, शिवसेना आमदार सचिन अहिर, माजी मंत्री सुभाष देसाई, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार रईस शेख, माकपचे प्रकाश रेड्डी, सीपीआयचे मिलिंद रानडे, शेकापचे राजू कोरडे, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, माजी आमदार विद्याताई चव्हाण आदीसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *