• Wed. Apr 30th, 2025

ग्रामपंचायत निवडणूक अनुषंगाने लातूर पोलिसांचे मध्यरात्री ऑल आउट ऑपरेशन

Byjantaadmin

Dec 16, 2022

 

ग्रामपंचायत निवडणूक अनुषंगाने लातूर पोलिसांचे मध्यरात्री ऑल आउट ऑपरेशन. तसेच 351 ग्राम भेटी व रूटमार्च चे आयोजन केले होते

लातुर:-आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुका शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडावे याकरिता ऑल आऊट ऑपरेशन राबविण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी दिले होते. त्यानुसार, दिनांक 15 डिसेंबर ते 16 डिसेंबर रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यत लातूर पोलिस कडून संपूर्ण लातूर जिल्ह्यात ऑल आउट ऑपरेशन राबविण्यात आले होते. तसेच 351 गावांना संबंधित पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी भेटी देऊन प्रत्येक गावात रोड मार्च करण्यात आला आहे. या आधीपण उपविभाग स्तरावर कोंबिंग ऑपरेशनचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्येही गुन्हेगारावर मोठ्या प्रमाणात कार्यवाही करण्यात आली होती.

दिनांक 15 डिसेंबर ते 16 डिसेंबर च्या मध्यरात्री राबविण्यात आलेल्या ऑल आऊट ऑपरेशन मध्ये पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांनी प्रत्यक्ष मार्गदर्शन करून जिल्ह्यातील 32 अधिकारी व 128 पोलीस अंमलदारांचे अनेक पथके तयार करून मोठ्या प्रमाणावर, प्रभावीपणे ऑल आउट ऑपरेशन राबविले. ऑपरेशन दरम्यान अवैध शस्त्र जप्ती, अग्नीशस्त्रे जप्ती, फरार आरोपी अटक करणे, लॉज व हॉटेल चेक करणे, पॅरोल आदेशाचा उल्लंघन केलेल्या आरोपींचा शोध घेणे, वाहने तपासणे,अभिलेखावरील गुंडाचा/गुन्हेगारांचा शोध घेणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करणे अशा प्रकारच्या कारवाईचा सामावेश होता.

त्यानुसार लातूर पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्र बाळगणाऱ्यावर दोन कारवाया केल्या असून 133 लॉजेस व हॉटेल तपासण्यात आले आहेत. न्यायालयाकडून काढण्यात आलेल्या व सतत पोलिसांना चकवा देणाऱ्या 26 आरोपींना वॉरंट बजावणी करून अटक करण्यात आलेली आहे. तसेच जिल्ह्यात विविध 38 ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करून 870 संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली. पोलीस रेकॉर्ड वरील 95 सराईत गुन्हेगारांना चेक करण्यात आले. मालाविषयक गुन्हा करण्याच्या उद्देशाने स्वतःचे अस्तित्व लपवून दबा धरुन बसलेल्या 16 इसमाविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122(क) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध दारु विक्री करणाऱ्यावर 23 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात मोठ्या प्रमाणात, प्रभावीपणे ऑल आऊट ऑपरेशन मध्ये केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

या ऑलआउट ऑपरेशनमध्ये जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी सहभागी झाले होते.

तसेच लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायती निवडणूक असल्याने पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांचे निर्देशान्वये प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत ग्रामभेटी चे आयोजन करण्यात आले होते सदरच्या ग्राम भेटीमध्ये ठाणे प्रभारी अधिकारी व बीट अंमलदार यांनी 351 गावात बैठका घेऊन गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन ग्रामपंचायत निवडणूक अतिशय उत्साही वातावरणात, निर्विघ्नपणे पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता प्रत्येक गावात पोलीस दलातर्फे रूट मार्च चे आयोजन करण्यात आले आहे.

एकंदरीत ग्रामपंचायत निवडणूक निर्विघ्न पार पाडण्यासाठी लातूर पोलिसांकडून जय्यत तयारी करण्यात आलेली असून लातूर पोलिसांच्या मदतीला जिल्ह्याबाहेरील पोलीस बंदोबस्त तसेच एस.आर.पी.एफ.च्या तुकड्या बंदोबस्त कामी मिळालेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *