निलंगा येथे पंडित शांताराम चिगरी संगीत अकादमीच्या वतीने आठवी त्रैमासिक संगीत सभा उत्साहात संपन्न
निलंगा:- येथे संगीत शिक्षक एकनाथ पांचाळ यांची ” पंडित शांताराम चिगरी ” नावाने संगीत अकादमी असून त्यांच्याकडे विविध वयोगटातील संगीतप्रेमी गायन,तबला व पेटी शिकण्यासाठी येत असतात.या सर्व विद्यार्थ्यांमधून काहींना कला प्रदर्शित करण्याची संधी व परगावाहून येणा-या तज्ञ कलाकारांचे गायन- वादन अशा त्रैमासिक सभेत सादर होत असते.यामध्ये तज्ञांचे गायन-वादन ऐकून व पाहून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यास मदत होते.तसेच त्यांचे स्टेज करेज वाढते.
यावेळी लातूर येथील नवोदित गायिका कु. शर्वरी डोंगरे हिचे बहारदार गायन झाले. तत्पूर्वी पाहुण्यांच्या हस्ते पंडित शांताराम गुरुजींच्या व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
त्यानंतर अकादमीच्या विद्यार्थ्यांनी ‘सरस्वती वंदना’ व ‘ओम नमोजी आद्या’ प्रार्थना सादर केली. त्यानंतर शर्वरी डोंगरे यांनी राग मारू बिहाग मधील बडा ख्यालाने गायनाला सुरुवात केली. त्यानंतर ‘ या भावनातील गीत पुराणे ‘ ‘सुरत पिया की न छिन बिसराये’ ‘सलोना सा सजन है’ ‘ भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ असे एकापेक्षा एक सरस गाण्यांनी मैफिल उत्तरोत्तर रंगत गेली.शेवटी भैरवी सादर करताना ‘ सध्या निकस गये,मै ना लडी थी ‘ ही ठुमरी गावून संगीत मैफिलीची सांगता केली. शर्वरीला हार्मोनियमची साथ तिचे गुरु प्रा. शशिकांत देशमुख यांनी केली. तर तबला साथ अकादमीचे संचालक प्रा. एकनाथ पांचाळ यांनी केली. या सर्व कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन श्री. प्रवीण गिरी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यामध्ये अकादमीतील सर्व पालकांचा, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.या कार्यक्रमासाठी प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
