गेल्या दहा वर्षात लातूरच्या भाजप खासदाराने सांगण्यासारखे एकही काम केले नाही-माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
जनतेला न्याय देण्यासाठी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डॉ. काळगे यांना मतदारापर्यंत नेऊन प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत -माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
लातूर शहरातील प्रभाग क्रमांक ५,६,७,८,९ मधील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्याची बैठक संपन्न
प्रतिनिधी : मंगळवार दि. २ एप्रिल २०२४ लातूर लोकसभा मतदार संघातील या निवडणुकीला अनेकांनी ‘डॉक्टर विरुद्ध कंत्राटदार’, ‘विज्ञान विरुद्ध अज्ञान’ आणि ‘दृष्टीहीन विरुद्ध दृष्टीदाता’ अशी संबोधले आहे. काँग्रेस महाविकास आघाडीचे ऊमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांनी ‘रुग्ण सेवा हीच ईश्वरसेवा’ हे ब्रीदवाक्य निवडले आहे, तर त्यांचे प्रतिस्पर्धी कंत्राटदाराचे ब्रीदवाक्य ‘निविदा सेवा हीच ईश्वरसेवा’ आहे. यामुळे येथील जनतेला न्याय देण्यासाठी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना डॉ. काळगे यांना मतदारा पर्यंत नेऊन प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. मंगळवार दि. २ एप्रिल रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरातील प्रभाग क्रमांक ५, ६, ७, ८, ९ मधील पदाधिकरी, कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश
काँग्रेसचे सरचिटणीस अमर खानापुरे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, काँग्रेसचे लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक सर्जेराव मोरे, अभय साळुंखे डॉ. अरविंद भातंबरे, माजी नगरसेवक अशोक गोविंदपूरकर, सचिन बंडापल्ले, युनूस मोमीन सचिन मस्के, ॲड. फारुक शेख, अहमदखा पठाण, व्यंकटेश पुरी, काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक ५ अध्यक्ष खाजामियां शेख, प्रभाग ६ अध्यक्ष गिरीश ब्याळे, प्रभाग ७ अध्यक्ष सुमित खंडागळे आदींसह लातूर शहरातील प्रभाग क्रमांक ५,६,७,८,९ मधील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित
होते. यावेळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे काँग्रेस पक्षाचे योध्दे आहेत. आपणाला अतिशय गांभीर्याने या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाऊन ही निवडणूक जिंकायची आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या उमेदवारीचे सामान्य माणसाकडून मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे. भारतीय जनता पार्टीच्या सरकारने गेल्या दहा वर्षात भारताला अभिप्रेत आहे असे कार्य केले नाही. भारतीयांची आर्थिक उन्नती त्यामुळे झाली नाही, सामान्य माणसाला त्यांनी गृहीत धरले आहे, खोके मोजून त्यांनी राज्यात पक्ष फोडला,
काही पक्ष फोडले तर त्यांचा मतदार आपणाला मतदान करेल असे त्यांना वाटते ते चुकीचे आहे. राज्यात महायुतीचे तीन पक्षांचे सरकार आहे, सध्या त्यांच्यामध्ये लोकसभेच्या उमेदवारीवरून गोंधळ सुरू आहे. त्यांनी महाराष्ट्राची चेष्टा सुरू केली आहे असे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांचा वैद्यकीय क्षेत्रातला दांडगा जनसंपर्क आहे. त्यांची जन्मभूमी निलंगा आहे, तर कर्मभूमी ही लातूर आहे. आपल्या जीवनाशी काडीमात्र संबंध नसणाऱ्या विषयावर सध्या भाजप राजकारण करत आहे. केंद्रातील भाजप सरकारने दोन कोटी नोकऱ्या, शेतीमालाला भाव दिला नाही, महागाई गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढ मोठ्या प्रमाणात केली आहे. महायुती सरकारने काल परवा घरगुती विजेचे दरही वाढवले आहेत, राज्यात, जिल्ह्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. महायुतीच्या विरोधात लोकांमध्ये विरोधाची लाट तयार होत आहे, तर महाविकास आघाडीचे भविष्य उज्वल आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सोबत घेऊन काम करावे असेही त्यांनी आवर्जून सांगीतले. जानवळ वडवळ भागात रेल्वेचे थांबे बंद डले आहेत आणि लातूरच्या मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीतून अद्याप कोच बाहेर आले नाहीत. या दोन्ही समस्या लातूर लोकसभा मतदारसंघातील लोकांसाठी महत्त्वाच्या आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी निवडणूक जिंकल्यानंतर ते रेल्वे कोच बाहेर काढतील असा विश्वास राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला आहे. मतदारांना मतदानाचा हक्क वापरून योग्य उमेदवार निवडण्याचे आवाहन केले जाते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अमर खानापुरे म्हणाले की, लातूर लोकसभा निवडणुकीची सर्वात मोठी धुरा, लातूर शहर विधानसभा मतदारसंघावर आहे. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याकडे सर्व महाराष्ट्र उद्याचे राज्याचे नेतृत्व म्हणून पाहतो, त्यासाठी लातूर लोकसभा आपण जिंकायलाच पाहिजे. काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी स्वतःच्या खांद्यावर घेऊन काम करावे. महाविकास आघाडीचे डॉ. शिवाजी काळगे हे विरोधातील उमेदवारापेक्षा अधिक सरस आहेत असे सांगून त्यांनी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना निवडणुकीतील विजयाच्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. या बैठकीचे प्रास्ताविक काँग्रेसचे लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक सर्जेराव मोरे यांनी केले तर माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी नगरसेवक अशोक गोविंदपुरकर यांनी मनोगत व्यक्त केले शेवटी आभार व्यंकटेश पुरी यांनी मानले.
