लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारण तापलं आहे. सर्वच पक्षांनी निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी कंबर कसली आहे. शिवाय, फोडाफोडीच्या राजकारणालाही उधाण आलं आहे. इच्छुक उमेदवार पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने पक्ष बदलत आहेत. तर काही ठिकाणी विरोधी पक्षातील तगडे नेते आपल्या पक्षात आणण्याचेही कार्यक्रम जोरदार राबवले जात आहे.याच पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या अगोदर के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस)लाही मोठा झटका बसला आहे. कारण, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री कदियम श्रीहरी यांनी मुलगी काव्या हिच्यासह पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या दोघांबरोबरच बीआरएसचे माजी आमदार बी मोहन रेड्डी यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.या तिघांचाही तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि काँग्रेसचे तेलंगणा प्रभारी दीपा दासमुन्शी यांच्या उपस्थितीत त्यांचा काँग्रेसमध्ये औपचारिक प्रवेश झाला. तेलंगणा विधानसभा निवडणुनकीत कदियम श्रीहरी हे बीआरएसच्या तिकीटावरून घणपूर मतदारसंघामधून विजयी झाले होते. तर त्यांची कन्या काव्या हिला लोकसभा निवडणुकीसाठी वारंगल मतदारसंघामधून उमेदवारी दिली गेली आहे. मात्र त्यांनी बीआरएसच्या तिकीटावर निवडणूक लढवण्यास नकार दर्शवला आहे.श्रीहरी यांनी तेलगू देसम पार्टीमधून आपला राजकीय प्रवास सुरू केला होता. यानंतर घणपूर विधानसभा मतदारसंघामधून ते चारवेळा विजयी झाले होते. तर पूर्वीच्या एकसंध आंध्र प्रदेशमध्ये त्यांनी टीडीपी सरकारच्या मंत्रिमंडळात शिक्षण, सिंचण, विपणन आणि समाजकल्याण यासारखे महत्तावाचे विभाग सांभाळले आहेत.यानंतर 2013मध्ये श्रीहरी यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. 2014च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी वारंगल मतदारसंघामधून विजय मिळवला होता. त्यानंतर तेलंगणातील पहिली विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी खासदारकी सोडली आणि उपमुख्यमंत्री झाले होते.
