महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. एकीकडे जागा वाटपावरुन युतीमध्ये धुसफूस सुरु असल्याचं समोर येत आहे. तर दुसरीकडे ज्या जागा जाहीर झाल्या आहेत त्या देखील मित्र पक्षातील नेत्यांना मान्य नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे युतीतील हा वाद आता चव्हाट्यावर आला आहे. तर तिकडे अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी घोषित केली आहे. मात्र राणा यांच्या उमेदवारीला आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने जोरदार विरोध केला आहे. शिवाय नवनीत राणा यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय देखील प्रहारने घेतला आहे.

बच्चू कडू आपल्या निर्णयावर ठाम असल्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी झालेली आहे. कडूंच्या याच बंडाच्या भूमिकेवर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू आणि आमचा संबंध नसल्याचं म्हटलं आहे. शिवाय युती ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हा तिढा सोडवतील किंवा मतदार ठरवतील ते होईल, असंही बावनकुळे म्हटले आहेत.महायुतीने राज्यातील उमेदवारांची यादी जाहीर केल्यापासून काही मतदारसंघातील वाद चव्हाट्यावर आले होते. अमरावती, शिरुर आणि बारामती या ठिकाणच्या जागांवरुन युतीत अनेक मतभेद सुरु होते. यापैकी शिरुर आणि बारामतीमधील मतभेद मिटवण्यात युतीला यश आलं आहे. परंतु अमरावतीतील जागेवरचा वाद काही केल्या मिटत नसल्याचं दिसून येत आहे. कारण प्रहार पक्षाचे बच्चू कडू यांनी आपण कोणत्याही परिस्थित राणा यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता हा वाद कसा मिटणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. अशातच आता बच्चू कडू आणि आमचा संबंध नसल्याचं वक्तव्य बावनकुळेंनी केल्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.अमरावतीमधील एका हॉटेलमध्ये भाजपची संवाद बैठक पार पडली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांचा वेगळा पक्ष असून त्यांची युती शिवसेनाशिंदे गटासोबत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री स्वत: अमरावतीत निर्माण झालेला तिढा सोडवतील. मात्र, तरीही कडू यांची नाराजी दूर झाली नाही, तर मतदार जे ठरवतील ते होईल, असं वक्तव्य केलं आहे. तसंच अमरावतीत भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्याचा निर्धार महायुतीच्या सर्व मित्र पक्षांनी केला आहे. नवीन उमेदवारामुळे नाराजी असते. परंतु, एका वेळी एकाच व्यक्तीला उमेदवारी देता येते. तरीही भाजपचा एकही पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज नसून ते नवनीत राणा यांचा प्रचार करतील असा विश्वासही बावनकुळेंनी व्यक्त केला.