दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी (Delhi Liquor Scam Case) मागील काही महिन्यांत आम आदमी पक्षाला मोठे धक्के बसले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, खासदार संजय सिंह यांना ईडीने तुरुंगात टाकले. मात्र, आज अनेक दिवसांनंतर ‘आप’ला मोठा दिलासा मिळाला आहे. मोदी सरकारवर सतत तोफ डागणारे संजय सिंह तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाने आज त्यांना जामीन मंजूर केला आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना संजय सिंह यांचे बाहेर येणे, ‘आप’साठी सुखावणारे आहे. सिंह यांना मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात ईडीने) अटक केली होती. दिल्ली हायकोर्टाने फेब्रुवारी महिन्यात त्यांना जामीन नाकारला होता. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. अखेर आज कोर्टाने त्यांना काही अटी व शर्तींच्याआधारे जामीन मंजूर केला.अरविंद केजरीवाल यांना दोन दिवसांपूर्वीच तिहार जेलमध्ये नेण्यात आले आहे. याच तुरुंगात संजय सिंह यांच्यासह सिसोदिया आणि बीआरएसच्या नेत्या के. कविता हे तिघेही आहेत. आता केजरीवाल जेलमध्ये जाताच सिंह यांना दिलासा मिळाला. ईडीने त्यांच्या जामिनाला विरोध केला नसल्याचे समोर आले आहे. त्यांना राजकारणात सक्रिय होता येणार असल्याचेही कोर्टाने म्हटले आहे.संजय सिंह यांनी जेलमधूनच राज्यसभेची निवडणूक लढवली होती. ही निवडणूक बिनविरोध पार पडल्याने ते दुसऱ्यांदा खासदार झाले. संसदेसह बाहेरही संजय सिंह यांच्याकडून सातत्याने भाजप व मोदी सरकारवर जोरदार टीका केली जाते. ‘आप’ची धडाडणारी तोफ म्हणून त्यांची ओळख आहे. आता लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झालेला असताना ते बाहेर आल्याने पक्षातील नेत्यांचे मनोबल वाढणार आहे.

चार नेत्यांना अटक होणार
आज सकाळीच आपच्या नेत्या दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. आपल्यासह चार नेत्यांना अटक करण्याचा भाजपचा डाव असल्याचे म्हटले आहे. आतिशी, सौरभ भारद्वाज, राघव चड्ढा आणि दुर्गेश पाठक यांचा या नेत्यांमध्ये समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळातच अटक होईल, असा दावाही त्यांनी केला.