लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) राजकीय पक्षांकडून उमेदवारी जाहीर केली जात असताना अनेकांना बंडखोरीचा सामना करावा लागत आहे, तर तिकीट नाकारल्याने अनेक विद्यमान खासदारांनी इतर पक्षांचा रस्ता धरला आहे. त्यामध्ये भाजपलाही अनेक धक्के बसले आहेत. आता बिहारमधील विद्यमान खासदार अजय निषाद यांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राज्यात भाजपला धक्का बसला आहे.निषाद हे मुजफ्फरपूर loksabha मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. सलग दोनदा ते या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. पण या वेळी भाजपने त्यांना उमेदवारी नाकारत डॉ. राज भूषण चौधरी यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे निषाद नाराज होते. अखेर आज सकाळी त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वासह पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देत असल्याची माहिती सोशल मीडियातून दिली.निषाद यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी आपला छळ केल्याने धक्का बसला. म्हणून राजीनामा देत असल्याचे निषाद यांनी एक्स हँडलवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी काही वेळातच काँग्रेसमध्ये प्रवेश केला.काँग्रेसमध्ये (Congress) दाखल होण्याआधी निषाद यांनी बिहार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह यांची भेट घेतली. काँग्रेस मुख्यालयात त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. या वेळी पक्षाचे प्रवक्ते पवन खेडा उपस्थित होते. ज्या व्यक्तीचा जन्म दोन ऑक्टोबरला झाला, ती व्यक्ती भाजपमध्ये काय करत होती, माहिती नाही, असे या वेळी बोलताना खेडा म्हणाले.दरम्यान, निषाद यांना काँग्रेसकडून मुजफ्फरपूर मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकते. इंडिया आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागा असून, आरजेडीला 26 जागा मिळाल्या आहेत, तर काँग्रेसला केवळ आठ जागा मिळाला आहे. उर्वरित जागा डाव्या पक्षांच्या वाट्याला गेल्या आहेत.

#WATCH | Delhi | Sitting Lok Sabha MP Ajay Nishad joins the Congress, shortly after resigning from the BJP. pic.twitter.com/8DEoJwUZg6
— ANI (@ANI) April 2, 2024